सिंदी (रेल्वे),
Ghagar Morcha : मागील काही दिवसांपासून शहरातील नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. त्यातही सध्या उन्हाळा असल्याने पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. दरम्यान, नागरिक आक्रमक झाले असून शहरातील पाण्याच्या समस्येसाठी आज बुधवार ७ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शप गट, काँग्रेस व उबाठा गटाच्या नेतृत्वात नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढण्यात आला.

शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुख्याधिकारी आठवड्यातून एक दिवस सिंदी नगरपरिषदेला भेट देतात. त्यामुळे सर्व कारभार नियोजनशून्य झालेले आहे. ज्या भागात पाणी टंचाई जास्त आहे त्या भागात जास्तीत जास्त प्रमाणात बोअरवेलचे नियोजन आधीच करणे आवश्यक होते. ज्या प्रभागात बोअरवेल नादुरूस्त आहेत त्या सुद्धा दुरुस्ती करण्यात आली नाही. नगरपरिषदतर्फे ५ दिवसानंतर पाणी पुरवठा होतो आणि तेही दीड तास पाणी मिळते. शहरात ८० टक्के नळांना तोट्या नाहीत व प्रत्येकाची इतके पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाही. त्यामुळे ३० टक्के पाणी वाया जाते. याबाबत कुठलेही नियोजन नाही. याबाबत राकाँ शप गटाच्या एका शिष्टमंडळाने ३ एप्रिल रोजी निवेदन दिले असता मुख्याधिकार्यांनी एका आठवड्यात सुधारणा करण्याबाबत मान्य केले होते. परंतु, अद्याप कुठलीही सुधारणा झालेली नाही.
पूर्वीप्रमाणे एप्रिल, मे, जूनमध्ये २ दिवसाआड व बाकी वेळेस एक दिवसाआड नियमित पाणी पुरवठा सुरू करावे, असे निवेदन देण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकार्यांनी तीन दिवसात शहरात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, तसे न झाल्यास राकाँचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला होता. मात्र, समस्या निकाली न निघाल्याने आज नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत नगरपरिषदेवर घागर मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला.
मोर्चात राकाँ शप गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, महेश झोटींग पाटील, सुधाकर खेडकर, माजी नगराध्यक्ष सुनीता कलोडे, गंगाधर कलोडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश डफ, आशिष देवतळे, सुनील बोंबले, बालू वानखेडे, सचिन लांबट, तुषार हिंगणेकर, मुन्ना शुला, आदी सहभागी झाले होते.
नपत तोडफोड
पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांचा मोर्चा पालिकेवर आला. मोर्चेकर्यांसोबत चर्चा करणारच या दरम्यान सुरुवातीला काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी माझ्या कार्यालयात येऊन खुर्च्यांची तोडफोड व परिसरातील खिडयांचे काच फोडून घाबरवण्याचा प्रयत्न केला. ही बाब निश्चितच निंदनीय आहे. मोर्चाबद्दल कुठलीही बंदी नाही, तो सर्वसामान्यांचा अधिकार आहे. परंतु, मोर्चाच्या आडून काही लोकांनी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला हे योग्य नाही. यामध्ये गावासह व काही गावाबाहेरील लोकं असून शासकीय मालमत्तेचे नुकसान व इतर कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वातावरण शांत झाल्यानंतर सर्व आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. पाणीपुरवठ्यामध्ये काही तांत्रिक मुद्दे असल्याने ते संबंधित विभागाकडून तपासून पुढील तीन दिवसात योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असे ठरल्याचे मुख्याधिकार्यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे.