रेडक्रॉस’ संघर्षग्रस्तांची सेवा करणारा संस्था

* सोसायटीचे सचिव डॉ. गुलवाडे यांची माहिती * आज आरोग्य तपासणी व जनजागृती शिबीर * जागतिक रेडक्रॉस दिन विशेष

    दिनांक :07-May-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर,
World Red Cross Day : रेडक्रॉस संस्था ही एक आंतरराष्ट्रीय मानवतावादी संघटन असून, तिचे मुख्य उद्दिष्ट मानवतेचे रक्षण करणे होय. जागतिक युद्धात व नंतर शांततेच्याही काळात या संस्थेने युद्धात बळी पडलेल्या पीडितांना संरक्षण आणि जखमी जवानांना मदत करण्याचे कार्य केले. सद्याही भारत-पाकिस्तान युद्धसदृश स्थिती दिसते आहे. अशावेळी नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. रेडक्रॉस संस्था आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी नेहमीच सज्ज आहे, असे मत चंद्रपूर रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे यांनी व्यक्त केले.
 
 
 
 
red cross
 
 
 
जागतिक रेडक्रॉस दिनाचे औचित्य साधून त्यांच्याशी संवाद साधला गेला. या संस्थेचे पदसिध्द अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. त्यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील आझाद बागेत गुरुवारी सकाळी 7 वाजता नागरिकांसाठी मोफत रक्तदाब व शुगर तपासणी शिबिराचे आयोजन रेडक्रॉस सोसायटीद्वारे करण्यात आले आहे. याच कार्यक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना ओआरएस पावडरचे वितरण देखील करण्यात येणार आहे.
 
 
 
संस्थेची स्थापना सुमारे 1980 मध्ये झाली होती. आज सोसायटीत 120 सदस्य कार्यरत असून, यामध्ये डॉक्टर्स व इतर कर्मचारी स्वयंसेवी स्वरूपात कार्य करतात. गेल्या वर्षभरात संस्थेने 30 हून अधिक उपक्रम राबवले असून, प्रत्येक मंगळवारी शहरात मोफत रक्तदाब आणि शुगर तपासणी केली जाते. इंदिरानगर, ऊर्जानगर यांसारख्या भागांमध्ये कर्करोग निदान चाचण्याही नियमितपणे घेतल्या जातात. ही संस्था आपत्ती, युद्ध, किंवा संकट काळात जखमी, आजारी आणि पीडित लोकांना तातडीची मदत पुरवते. लवकरच आदिवासी भागातील नागरिकांसाठी सिकलसेल अ‍ॅनिमिया व थँलासेमिया यासारख्या गंभीर आजारांबाबत तपासणी आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांमुळे आरोग्य सेवा दूरवरच्या भागात पोहोचवण्याचे कार्य सोसायटी करीत आहे. अशी माहिती गुलवाडे यांनी तभाला दिली.