रामबाग मैदानासाठी ‘मातीचा सत्याग्रह’!

*कंत्राटदाराने खोदलेल्या खड्ड्यात माती टाकून आंदोलन *जिपच्या इमारत बांधकामाला नागरिकांचा विरोध

    दिनांक :08-May-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
Chandrapur-Rambagh Maidan : रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीच्या आवाहनानंतर गुरुवार, 8 मे रोजी सकाळी 7 वाजता नागरिक,खेळाडू तसेच पोलिस व सैन्य भरतीसाठी सराव करणार्‍या युवकांनी कंत्राटदराने मैदानात खोदलेल्या खड्ड्यात पुन्हा माती टाकली! या आंदोलनाला ‘मातीचा सत्याग्रह’ असे नाव देण्यात आले.
 
 
 
 
chand
 
 
 
कोणत्याही परिस्थितीत रामबाग मैदानाचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू देणार नाही, तेथे सिमेंट काँक्रीटचे जंगल होऊ देणार नाही, जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. गेल्या चार-पाच दशकापासून नागरिक या मैदानाचा वापर सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी करीत आहेत. सिंधी व ताडाच्या वृक्षांनी या मैदानाच्या सौंदर्यात विशेष भर टाकली. मैदानाशी अनेक नागरिकांच्या भावना जुळलेल्या असल्याने कोणत्याही परिस्थितीत या मैदानावर इमारतीचे बांधकाम करू नये, अशी स्थानिक नागरिक व खेळाडूंची भावना आहे.
 
 
 
बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने मैदानावर खड्डा खोदल्यानंतर नागरिक संतप्त झाले व त्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला. जोपर्यंत जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम इतरत्र स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आमचा विरोध सुरू राहील अशी भूमिका रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने घेतली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता मुकेश टांगळे यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता एक बैठक पार पडली. या बैठकीला पप्पू देशमुख, भरत गुप्ता व रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे इतर अनेक सदस्य उपस्थित होते. मात्र, बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही.
 
जिप प्रशासन नागरिकांची दिशाभूल करीत आहे : देशमुख
 
 
नविन इमारत बांधण्याकरिता इतर ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असताना प्रदूषित शहरातील सौंदर्याने नटलेल्या एका निसर्गरम्य क्रीडांगणावर जिल्हा परिषदेची इमारत बांधण्याचे नियोजन करणे योग्य नाही. 9 मे रोजी पुराव्यानिशी जिल्हा परिषद प्रशासनाचा पर्दाफाश करणार, अशी माहिती रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी दिली.