Mango Panna Boondi Recipe उन्हाळा सुरू झाला की मनात पहिली आठवण येते ती आंब्याची. कधी कैऱ्यांची चटणी, कधी आंब्याचं पन्ह तर कधी आंब्याचा रस – ही सगळी चव मनाला थंडावा देणारी असते. पण यावर्षी उन्हाळ्याला खास चव देण्यासाठी एक हटके रेसिपी – आंब्याच्या पन्हाची बुंदी!
पारंपरिक बुंदीला कैरीच्या पन्हाचा आंबटगोड आणि थंडसर स्पर्श दिला की तयार होते ही तोंडात विरघळणारी, चविष्ट पन्ह बुंदी. ही रेसिपी खास सण, पाहुणचार किंवा उन्हाळ्यातील गोडसर खाऊ म्हणून उत्तम ठरते.
साहित्य :
पन्ह तयार करण्यासाठी :
कच्ची कैरी – २ मध्यम आकाराच्या
साखर – १ कप (चवीनुसार वाढवू/कमी करू शकता)
वेलदोड्यांची पूड – ½ टीस्पून
मीठ – चिमूटभर
पाणी – २ कप
बुंदी तयार करण्यासाठी :
बेसन – १ कप
पाणी – ½ कप (सैलसर घोलासाठी)
साखर – ¾ कप (साखर पाकासाठी)
पाणी – ½ कप (साखर पाकासाठी)
केशर किंवा पिवळा रंग – थोडासा
तेल – तळण्यासाठी
रेसीपी :
१. पन्ह तयार करण्याची प्रक्रिया :
कैऱ्या धुऊन कुकरमध्ये २ शिट्ट्या करून उकडून घ्या.
थंड झाल्यावर कैरीचा गर काढून घ्या.
मिक्सरमध्ये गर, साखर, मीठ, वेलदोड्याची पूड आणि पाणी घालून मिक्स करून गाळा.
हे तयार पन्ह थोडं गार होऊ द्या.
२. बुंदी तयार करण्याची प्रक्रिया :
बेसनात थोडं थोडं पाणी घालून सैलसर, एकसंध घोळ तयार करा.
त्यात रंग मिसळा.
गरम तेलात बुंदीच्या झाऱ्यावरून हे मिश्रण ओतून गोल बुंदी तळून घ्या.
साखर व पाणी एकत्र करून एकतारी पाक तयार करा.
तळलेली बुंदी या पाकात घालून ५ मिनिटं मुरू द्या.
किंवा बाजारात रेडिमेट मिळणारी बुंदी वापरू शकता,घरी बनवली तर चव उत्तम येईल
३. अंतिम स्टेप – पन्ह बुंदी :
पन्ह थोडं गार असताना त्यात साखर पाकातून गाळलेली बुंदी घालून मिसळा.
थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून थंडसर ‘पन्ह बुंदी’ सर्व्ह करा!
टीप :
बुंदी खुसखुशीत हवी असल्यास पन्हात घालण्याआधी थोडी वेळ वाफवू नका.
कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचं प्रमाण कमी-जास्त ठेवा.
---
थोडं वेगळं, थोडं पारंपरिक – ‘पन्ह बुंदी’ ही चवदार रेसिपी नक्की ट्राय करा आणि उन्हाळ्यातील उकाड्यात थंडावा मिळवा!