खरांगणा (मो.),
Animal Rescue : बांगडापूरकडून खरांगणाकडे पिकअपमध्ये जनावरांना डांबून वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मोरांगणा टी पॉइंटजवळ नाकाबंदी केली. संशयित पीकअप वाहन येताच चौकशी केली असता त्यात सहा जनावरे आढळून आली. पोलिसांनी सहा जनावरांची सुटका करीत १९ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत कैलास चोरमोरे (२९) रा. भाटेपुरी जि. जालना आणि सूरज भोसले (१९) रा. सोमनाथ जि. वर्धा यांच्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई बुधवार ७ रोजी करण्यात आली.
खरांगणा पोलिस गस्तीवर असताना पीकअप वाहनाने जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे मोरांगणा टी पॉइंटवर नाकाबंदी केली. वाहन अडवून चौकशी केली असता कैलाश चोरमारे आणि सूरज भोसले यांनी ही जनावरे जालना येथे शेती वाहण्याकरिता नेत असल्याचे सांगितले. या वाहनात एक बैलजोडीसह अन्य ४ बैल आढळून आले. ही जनावरे वाहनात कोंबून होती. बैल भुकेने आणि तहानेने व्याकूळ होती तर वाहनात निर्दयतेने कोंबून असल्याने दोघांनाही ताब्यात घेतले.