तभा वृत्तसेवा
सावली,
Crop damage : तालुक्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारिपीटीने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे उन्हाळी धानपिक व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
सावली तालुक्यात यंदा रब्बी हंगामात 427.30 हेक्टरमध्ये शेतकर्यांनी मक्का पिकाची लागवड केली, तर 640 हेक्टरमध्ये उन्हाळी धान पीक घेतले आहे.
मात्र पिक हाती येण्याचे मार्गावर असतांना मागील काही दिवसांपासून सर्वत्र वादळी वार्यासह पाऊस कोसळला. सततच्या पावसामुळे डोलणारे धानपीक पूर्णत: जमिनीवर झोपले आहे. याच वर्षातील खरीप हंगामातील धानपिक अशाच पध्दतीने ऐन हातात येत असताना लष्करी अळीने आक्रमण केल्याने शेतकर्यांचे अर्धे पीक नष्ट झाले होते. जे पीक हाती आले त्यात शेतकर्यांना कर्जसुद्धा फेडता आले नाही. त्यामुळे शेतकर्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली आणि मिळालेल्या उत्पन्नातून ते कर्ज फेडण्यासाठी आशेवर होते. मात्र ही आशा अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटामुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने पंचमाने करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.