अट्टल घरफोड्या जेरबंद, ४.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

09 May 2025 20:20:31
वर्धा, 
Wardha News : स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने अट्टल घरफोड्यास अटक करून ४ लाख ६७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वर्धा व नागपूर जिल्ह्यातील १३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. खुशाल बारापात्रे (३७) रा. नवीन वस्ती, बुटीबोरी जि. नागपूर, ह. मु. जाम ता. समुद्रपूर याला अटक केली.
 
 

jklj
 
 
 
सेलू येथील पल्लवी भलमे या परिवारासह बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने मंगळसुत्र, सोन्याचे झुमके, सोन्याची अंगठी, नथ, सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याचा गोफ, चांदीची चेन, लॉकेट, कडे, जिवती, रोख २० हजार असा १ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तक्रारीवरून सेलू पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.
 
 
 
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलमार्फत करण्यात आला. तांत्रिक तपास करुन वर्धा जिल्ह्यामध्ये होत असलेल्या घरफोडी संबंधाने गस्त करताना एक संशयित इसम जाम येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जाम गाठून खुशाल बारापात्रे याला ताब्यात घेतले. त्याच्या खोलीवर घरफोडीचे साहित्य व सेलू येथील चोरीस गेलेला मुद्देमाल मिळून आला. अधिक विचारपूस केली असता सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट, गिरड, सिंदी (रेल्वे), नागपूर आदी १३ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याचे सहकारी कमलेश नगराळे, सुमेध उंबरे दोन्ही रा. वरोरा यांच्या मदतीने वरोरा येथे सोने व चांदीचे दागिने विकल्याचे सांगितले. त्यांच्याकडून सुद्धा ११ गुन्ह्यातील ४ लाख ५७ हजार ९५० रुपयांचे दागिने, चांदीचे दागिने, मोबाईल, लोखंडी सळाख, असा ४ लाख ६७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, अंमलदार शेखर डोंगरे, सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, विकास मुंडे, सुगम चौधरी, अरविंद इंगोले, शुभम राऊत, राहुल अधवाल, राहुल लुटे व सायबर सेलचे दिनेश बोथकर, अनुप कावळे, विशाल मडावी, अंकित जिभे यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0