वर्धा,
Wardha News : कारंजा (घाडगे) पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्या एका गावातील पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीस पोलिसांनी धुळे जिल्ह्यातून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलगी शिकवणी वर्गाला गेली होती. परंतु, ती परत आली नाही. तिचा नातेवाईक व इतर ठिकाणी शोध धेतला. परंतु, ती मिळून आली नाही. तिला अज्ञात इसमाने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले, अशा तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.

सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिस अधीक्षक अनुराग जैन व अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास करून माहिती घेतली असता पीडित मुलगी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील आपल्या इंस्टाग्रामवरील मित्राच्या घरी जाऊन ती दोन-तीन दिवस राहिली. तेथून ती नागपूरला येऊन आपल्या इंस्टाग्रामवरील दुसर्या मित्राकडे गेली. तिथे सहा-सात महिने राहिली. त्यानंतर त्याच्यासोबत वाद होत असल्याने स्वतः निघून मालेगाव जि. नाशिक येथे गेल्याचे कळले. दरम्यान, रडत असताना तिला अनिल गायकवाड व त्याची पत्नी भेटली. मुलीसोबत अनुचित प्रकार घडू नये म्हणून गायकवाड दाम्पत्यांनी मुलीस घरी नेले, अशी माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी चाळीसगाव जवळील हेंद्रुन येथून तिला ताब्यात घेतले. यानंतर तिला कारंजा पोलिसांच्या स्वाधीन केले.