नागपूर,
Khaparkheda Thermal Power Station पर्यावरणाला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे उपराजधानीच्या नागपूर शहरात खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून राखमिश्रित पाणी सोडले या प्रकारामुळे पर्यावरण दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतजमिनीसह भूगर्भातील पाणी दूषित होत आहे. महाजेनको स्वत:च्याच जागेचा वापर करत असली तरी राखमिश्रित पाणी सोडताना पर्यावरणाचे नियम आणि शास्त्रीय पद्धतीचा वापर करावा, अशी स्थानिकांची विनंती आहे.
- खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातून सोडले जाते दूषित पाणी
औष्णिक वीज निर्मिती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात राख (फ्लाय अॅश) तयार होते. होणार्या राखेसोबत मिसळलेल्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. राखमिश्रित पाणी सोडण्यासाठी खापरखेडा औष्णिक वीज केंद्राने २० वर्षांपूर्वी नांदगाव आणि बखारी या गावांतील जमीन खरेदी केली. बखारी गावातील जमीन पडीक असल्याने स्थानिकांनी एनओसी दिली. आता याठिकाणी नव्याने राख बंधारा बांधण्यात आला. त्यात आठवडाभरापासून राखमिश्रित पाणी सोडले जात आहे. राखेचा ड्रॉपिंग एंड हद्दीत असल्याने सर्वात जास्त फटका स्थानिकांना बसत आहे. राखमिश्रित पाणी भूगर्भात जात असल्याने शेतीसह जवळच असलेल्या विहिरींमधील पाणी दूषित होत आहे.
पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. मातीची गुणवत्ता घटते आणि पिकांवर विपरीत परिणाम होतो. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. राखेचा वापर बांधकाम सामग्रीमध्ये करण्यामुळे पर्यावरणावर होणारा वाईट परिणाम कमी होतो. मिसळलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे आवश्यक आहे.
शास्त्रीय पद्धतीनेच राखमिश्रित पाणी सोडावे
खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात नव्याने राख साठवण्यासाठी बंधारा तयार करण्यात आला. मात्र, हे करीत असताना लगून आणि लायनिंग केलीच नाही. बंधार्यात राख मिसळलेले पाणी सोडले जात आहे. त्या ठिकाणापासून केवळ शंभर मीटर अंतरावर नदी आहे. त्यामुळे पेंच नदीचे पाणीही दूषित होण्याची शक्यता आहे. राखमिश्रित पाणी सोडत असलेल्या जागेपासून ३०० मीटरवर नांदगाव पाणीपुरवठा विहीर आहे. राखेतील रसायनयुक्त पाणी झिरपून विहिरीचे पाणी दूषित होऊ शकते. राखेतील आरोग्याला घातक रसायन पाणीपुरवठा विहिरीत झिरपून गावकर्यांना धोका संभवतो. राख मिसळलेल्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी, प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण मंत्रालयासारख्या नियामक यंत्रणांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच शास्त्रीय पद्धतीनेच राखमिश्रित पाणी सोडावे.
लिना बुद्धे, संस्थापक संचालक (सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट)