उद्या ‘हदगाव शहर बंद’ची हाक

12 Jun 2025 20:30:03
तभा वृत्तसेवा
हदगाव,
Hadgaon city closed : माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू मागील चार दिवसांपासून मोझरी येथे विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाची शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शुक्रवार, 13 जून रोजी ‘हदगाव बंद’ची हाक देण्यात आली आहे.
 
 
 
y12Jun-Band
 
या बंदची अधिकृत माहिती देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल कदम यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने हदगाव पोलिस ठाण्यात निवेदन दिले. या निवेदनात शासनाच्या उदासीन धोरणाचा तीव्र निषेध करण्यात आला.
बच्चू कडू यांच्या मागण्यांना तातडीने मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने अनेकदा आश्वासने दिली, बैठका घेतल्या, परंतु अद्याप ठोस निर्णय न घेतल्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर अन्याय होत असल्याचा आरोपही या शिष्टमंडळाने केला आहे.
बच्चू कडू यांनी त्यांच्या उपोषणात शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला, शेतमजूर, बेरोजगार युवक, दुग्धव्यवसायी आणि ग्रामीण भागातील गरजू नागरिकांच्या अडचणींना वाचा फोडली आहे.
त्यांनी दिव्यांग व विधवांना दरमहा 6 हजार रुपये मानधन द्यावे, शेतकèयांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतमालाला भरपूर उत्पादन असतानाही हमीभावावर नुकसान सहन करावे लागत असल्याने हमीभावासोबत वीस टक्के अनुदान द्यावे असे त्यांनी म्हटले आहे.
युवकांमध्ये वाढती बेरोजगारी ही गंभीर समस्या असून, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे अथवा किमान सन्मानजनक वेतन देणे, सरकारी रिक्त पदे तातडीने भरावीत आणि नव्या भरतीची भरपूर जाहिरात करण्यात यावी, हीसुद्धा त्यांची मागणी आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाने जनतेमध्ये या विषयावर जागरूकता निर्माण करण्यासाठी हदगाव बंदची घोषणा केली आहे. शहरातील व्यापारी, नागरिक, संस्था व संघटनांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन ‘प्रहार’चे तालुकाध्यक्ष अनिल कदम यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0