अमझरीत केंद्र शासनाची ‘होम स्टे’ योजना

पर्यटकांना होणार आदिवासी संस्कृतीचे दर्शन

    दिनांक :14-Jun-2025
Total Views |
चिखलदरा,
Home Stay scheme केंद्र शासनाच्या वतीने पर्यटकांना आदिवासींचे जीवन जवळून अनुभवता यावे यासाठी राज्यातील बारा जिल्ह्यांचे सर्वेक्षण करून शबरी आदी पर्यटन योजनेत २५ गावे निवडली आहेत; त्यामध्ये चिखलदरा तालुक्यातील ग्राम अमझरी (खटकाली) या गावाची निवड करण्यात आली आहे. राज्यातील पंचवीस पाड्यांवरील आदिवासी जीवन अगदी जवळून अनुभवण्याची संधी पर्यटकांना लवकर मिळणार आहे. केंद्र शासनाच्या आदिवासी मंत्रालयाद्वारे पर्यटनपूरक आदिवासी गावे निवडून प्रत्येक गावामध्ये पाच लक्ष रुपये होम स्टे योजनेकरिता देण्याची तरतूद केली आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमधील २५ गावांकरिता १३.७५ कोटी रुपये केंद्र शासनाने यापूर्वीच मंजूर केले होते.
 
 
amravti
 
राज्य शासनाने ९.९९ कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर केले असून सदर योजनेकरिता एकूण २३.७४ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक गावाकरिता ९४.९६ लाख रुपये एवढा खर्च करण्यात येणार असून आदिवासी गावांमध्ये प्रत्येकी पाच लक्ष रुपये अनुदानित दहा होम स्टेचे बांधकाम करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शबरी आदिवासी विकास मंडळाद्वारे ग्राम पर्यटन समितीची स्थापना करण्यात येणार आहे. Home Stay scheme पायाभूत सुविधांसाठी वेगळा खर्चही करण्यात येणार आहे. शबरी आदी पर्यटन योजना राबविताना पर्यटकांना आदिवासी जीवन शैलीचा अनुभव देणे, पर्यटनासाठी उत्पन्नाचे नवेस्त्रोत निर्माण करणे, आदिवासी कला संगीत नृत्य आणि हस्तकलेचा प्रचार करणे, शाश्वत पद्धतीचा अवलंब करून पर्यावरणाचे रक्षण करणे, पर्यटकांसाठी स्मरणवस्तूची दुकाने निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमुळे आमझरी गावाच्या शिरपेचात पुन्हा नव्याने मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. नुकतीच या गावाला आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांनी भेट दिली. यावेळी आ. केवलराम काळे व स्फुर्ती क्लस्टरचे संचालक सुनील भालेराव यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर उपस्थित होते.