मोरभवनातून दिवसभरात ३९० एसटी बसगाड्यांची ये-जा

15 Jun 2025 21:51:59
नामदेव भदे,
नागपूर,
Morbhavan Bus Stand : शहराच्या मध्यवर्ती सीताबर्डी भागात असलेल्या मोरभवन बसस्थानकाची अवस्था अतिशय गंभीर झाली पावसाळा सुरू होताच मोरभवन बसस्थानकाची बिकट अवस्था होत असते. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण स्थानकावर चिखलाचे साम्राज्य दिसून येते. बसस्थानकाची दयनीय अवस्था लक्षात घेता शासनाने याकडे प्राधान्यक्रमाने लक्ष देण्याची मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे. नागपूर महानगराचा वाढणारा विस्तार आणि प्रवासी संख्येत झालेली वाढ बघता मोरभवन परिसरात अद्ययावत सुविधांशिवाय अन्य नाही.
 

NGP
 
दिवसभरात ३९० बसगाड्यांची ये- जा
 
 
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मोरभवन बसस्थानक येथून दिवसभरात ३९० बसगाड्यांची ये- जा होते. यात प्रामुख्याने इलेक्ट्रीक बसेसचा समावेश आहे. पारशिवनीकरिता दिवसभरात दहा बसेस असून शाळा सुरु होताच पुन्हा एक बस सुरु होईल. कळमेश्वर मार्गे जलालखेडा, तर पाटणसावंगी मार्गे सावनेर, कामठी मार्गे रामटेक प्रत्येक तासाने उपलब्ध आहे. याशिवाय हिंगणा, कामठी, कन्हान, लोधा, मनसर, पवनी, देवलापार, वडधामना, गोंडखैरी, बाजारगांव, शिवा अडेगांव, मोर्शी, काटोल,अमरावती, वरुड, कान्होलीबारा, वर्धा कवर्धा बसेस प्रवाशांसाठी आहे.
 
मोरभवन मार्गे ४० टक्के बसगाड्या धावतात
 
मोरभवन बसस्थानकाच्या दर्शनी भागात बस सुटण्याचे वेळापत्रक लावण्यात आले आहे. यामुळे दिवसभरातील बसगाड्यांची माहिती प्रवाशांना होते. गणेशपेठ सुटणार्‍या ४० टक्के बसगाड्या मोरभवन मार्गे पुढे रवाना होतात. यात प्रामुख्याने अमरावती, अकोला, आकोट, अंजनगाव सुर्जी, छ.संभाजी नगर अकोला, चिखली, जालना, कारंजा लाड, चांदूरबाजार, तेल्हारा, दर्यापूर, परतवाडा, बुलढाणा, भोकरबर्डी, मेहकर (सेलू), मोर्शी मार्गे अमरावती, रिसोड, वाशिम, शेगाव, चांदूररेल्वे, चिखली, जळगाव जामोद, लोणार, कोंढाळी मार्गे, सावनेर मार्गे, पारशिवणी, आर्वी, पारशिवनी हिंगणा मार्गे, कान्होलीबारा चौकी, आंधाळगाव, नरखेड, मोवाड, पांढुर्णा, लोणी करीता बसेस उपलब्ध आहे.
 
गैरसोयींमुळे प्रवाशांची भटकंती
 
मोरभवन बस स्थानक परिसरात प्रवाशांना अनेकप्रकारे गैरसोयीचा सामना करावा लागतो. बसच्या प्रतिक्षेत मोकळया मैदानात उभे राहावे लागते. कोणत्या बसेस कोणत्या नंबर टर्मिनलवरुन जाईल, याबाबतच फलक नसल्यामुळे प्रवाशांना भटकंती करावी लागते. बसच्या प्रतिक्षेत जागा नसल्याने एखाद्या झाडांच्या सावलीत जागा शोधावी लागते.
 
मोरभवनच्या परिसरात उच्च दर्जाचे बसस्थानक बांधले जाणार अशी घोषणा अनेकवेळा झाली मात्र पुढे काहीच झाले नाही. ही मोठी शोकांतिका आहे. आजच्या घडीला हजारो प्रवाशांना बसच्या प्रतिक्षेत दिवसभर गैरसोयींचा सामना करावा लागतो. प्रवाशांसाठी सुविधाजनक व्यवस्था केल्यास मोरभवन बस स्थानकाचे चित्र बदलण्यास वेळ नाही. प्रवासी संख्या व उत्पन्न वाढविण्यासाठी मोरभवनचा कायापालट करण्याची नितांत गरज आहे.
 
 
पावसाळ्यात साचते पाणी
 
मोरभवन बसस्थानक परिसरात पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना बसस्थानक परिसरात दिसून येत नाही. प्रवाशांसाठी अद्ययावत शेड बांधण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. प्रवासी संख्या घेता प्रसाधनगृह, थंड पाणी आदी सोयी-सुविधांचा अभाव मोरभवन येथे स्पष्ट दिसून येतो.
 
अद्ययावत सुविधा मिळणार - पालकमंत्री
 
 
अद्ययावत सुविधांसह पंचतारांकित दर्जाप्रमाणे मोरभवन बसस्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मोरभवन व गणेशपेठ येथील बसस्थानक आता प्रगत स्वरुपात प्रवाशांच्या भेटीला आणण्यासाठी नियोजन केल्या जात आहे. दोन्ही स्थानके अद्ययावत सुविधांसह झाल्यानंतर दोन्ही स्थानकाचे स्वरुप बदललेले दिसणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0