मुंबई,
Aamir Khan बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान अलीकडेच 'आपकी अदालत' या चर्चासत्रात सहभागी झाला होता. या मुलाखतीदरम्यान आमिरने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर, विशेषतः आपल्या मुलांबद्दल खूप भावनिक होऊन अनेक गोष्टी उघड केल्या. त्याने आपल्या मुलांना – आयरा खान आणि जुनैद खान – दिलेल्या वेळाबद्दल पश्चाताप व्यक्त केला आणि भावनिक होऊन रडू लागला.
"मी मुलांना वेळ दिला नाही" – आमिर खान
आमिर म्हणाला, “माझा प्रवास वयाच्या १८ व्या वर्षी सुरू झाला. मी सर्जनशीलतेच्या नशेत इतका बुडालो होतो की मी कधीच थांबलो नाही. पण कोविडच्या काळात जेव्हा मी घरी एकटाच बसलो होतो, तेव्हा मला विचार करायला वेळ मिळाला. तेव्हा मला जाणवलं की मी माझ्या कुटुंबाला आणि विशेषतः मुलांना वेळ दिलाच नाही. मी त्यांच्या सोबत होतो, पण माझं लक्ष मात्र कुठे तरी दुसरीकडेच असायचं.”
"माझी मुले मोठी झाली आणि मी ते पाहिलंच नाही"
आमिरने पुढे सांगितलं की, “कोविड दरम्यान जेव्हा मी हे सगळं विचार करत होतो, तेव्हा मला खूप अपराधी वाटलं. आयरा जेव्हा ४-५ वर्षांची होती, तेव्हा ती काय विचार करत होती, तिची स्वप्नं काय होती, तिच्या भीती काय होत्या – हे मला कधीच माहीत नव्हतं. पण मला मात्र माझ्या दिग्दर्शकांची स्वप्नं माहीत होती. हे जाणवून खूप वाईट वाटलं. त्यामुळे मी ठरवलं की आता मी काम थांबवणार.”या आत्मपरीक्षणानंतर आमिरने ठामपणे ठरवलं होतं की 'लाल सिंग चड्ढा' हा त्याचा शेवटचा चित्रपट असेल. तो म्हणाला, “मी कुटुंबाची माफी मागितली आणि त्यांना सांगितलं की मी चित्रपट सोडतोय. पण माझ्या कुटुंबाने, विशेषतः माझ्या मुलांनी आणि माजी पत्नी किरणने मला समजावून सांगितलं. किरण रडलीसुद्धा आणि म्हणाली, ‘जर तू चित्रपट सोडत आहेस, तर तू आम्हाला सोडून चाललायस.’ त्यावेळी मला कळलं की मी अतिरेकी निर्णय घेत होतो.”
"चित्रपट सोडणार नाही" – आमिरचा निर्धार
या सगळ्या प्रसंगानंतर आमिर म्हणतो, “मी ठरवलं आहे की आता मी चित्रपट सोडणार नाही. मी चित्रपट करत राहीन आणि त्याचबरोबर माझ्या कुटुंबालाही वेळ देईन.”आमिर खानचा हा भावनिक प्रवास अनेकांसाठी डोळे उघडणारा ठरू शकतो. कामाच्या नशेत हरवताना आपण आपल्या जवळच्या लोकांना किती वेळ देतो, याचा विचार प्रत्येकाने जरूर करायला हवा.