अनिल फेकरीकर,
नागपूर,
Nagpur News : राजाश्रयासह लोकाश्रय ज्याला मिळतो तो यशकीर्ती पावतो. पण शुद्ध देशी गोवंशाला राजाश्रयासोबत लोकाश्रय मिळत नसल्याने आज त्यांची अवस्था बिकट झाली आहे. गाईंच्या अनेक जाती तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या स्थितीत गोवंशाचे जतन व्हावे असा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवत महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने येणाèया 22 जुलै 2025 रोजी शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन साजरा करण्याचे प्रथमच ठरविले आहे.
हा दिवस तर शासनाने साजरा करावा, सोबत सरकारी गुराखी योजनाही राज्यात प्रत्यक्षात आणावी. महाराष्ट्रात एकूण 28814 ग्रामपंचायती आहेत. समजा प्रती ग्रामपंचायत एक सरकारी गुराखी नेमला तर 28814 युवक - युवतींना रोजगार मिळेल. एक देशी गोवंशाच्या गाईसाठी प्रति महिना मानधन 200 रुपये याप्रमाणे सरकारी गुराख्याला गोपालकांनी दिल्यास त्याला सरासरी 50 गाईंना चराईला नेण्यापोटी 10 हजार रुपये महिन्याचे मिळतील. आता हा पैसा ग्रामपंचायत वसूल करेल आणि सरकारी गुराख्याला मानधनाच्या रूपात देईल.
परिणामी त्यांना रोजगारासह देशी गोवंशाचे जतन होईल अशी संकल्पना पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील गोपालक उमाकांत फेकरीकर यांनी मांडली आहे. ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी ठरल्यास 14 लाख 40 हजार 700 देशी गोवंश असलेल्या देवणी, लालकंधारी, खिल्लार, डांगी, गवळाऊ गाईंचे जतन होईल. यातूनच शेतीला शेणखत मिळेल. गोबर गॅसचाही उपयोग केल्यास एलपीजी सिलेंडरची बचत होईल. शुद्ध दूध मिळेल. त्यापासून तूप तयार करता येईल. शेतीसाठी उपयुक्त बैल प्राप्त होतील. शेवटी, गोरक्षणी स्वरक्षण। ऐसे पूर्वजांचे कथन। ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संकल्पनाही यातून पूर्णत्वास जाईल.
रामटेकपासून शुभारंभ करणार
सरकारी गुराखी ही संकल्पना उपयुक्त आणि दूरगामी लाभदायक आहे. याकरिता कुशल मनुष्यबळाची गरज लागेल. त्यानुसार प्रथमत: गो विज्ञान अनुसंधान केंद्राने सुरू केलेला कौशल्याचा अभ्यासक्रम संबंधितांनी पूर्ण करावा. त्यातून जे युवक युवती शिकून परिपूर्ण होतील, त्यांना सरकारी गुराखी नेमल्यास नक्कीच त्यांचा चांगला उपयोग शुद्ध देशी गोवंश जतनात होईल, अशी भूमिका गो - विज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष पद्मेश गुप्ता यांनी मांडली आहे. शिवाय या योजनेची फलश्रुती पाहता रामटेक तालुक्यापासून याचा आपण शुभारंभ करू, असाही निर्धार पद्मेश गुप्ता यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, याकरिता ग्रामपंचायत, तहसीलदार यांनीही पुढाकार घ्यायला हवा असेही त्यांनी स्पष्ट केले.
गाय कामधेनू हे विसरू नका
पूर्वी गाईशिवाय शेतकèयांचे पान हलत नव्हते. आज यांत्रिकीकरणामुळे गाय, बैल शेतातून हद्दपार झाले. परिणामी पौष्टिक तत्त्व संपले. आरोग्य धोक्यात आले. पूर्वी शेणखताचा अधिक उपयोग असल्याने सर्वजण सुदृढ राहायचे. तेच दिवस पुन्हा यावे असे वाटत असेल तर गाईंविषयीची मानसिकता बदलावी लागेल, असे मत आमदार चरणसिंग ठाकूर यांनी मांडले. एकंदरीत पाहता गाय कामधेनू आहे, हे कदापि विसरू नका असेही आमदार चरणसिंग ठाकूर यांनी निक्षून सांगितले.