मुंबई,
Yami Gautam बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यामीने आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले असून तिच्या प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळेपण असते. तिने आपल्या करिअरची सुरुवात ‘विकी डोनर’ या गाजलेल्या चित्रपटातून केली होती. या चित्रपटाने तिला लोकप्रियता दिली, मात्र त्यानंतर यामीच्या करिअरमध्ये एक असा टप्पा आला जेव्हा तिने इंडस्ट्री सोडून गावी परतण्याचा निर्णय घेतला होता.
अलिकडेच गलाटा प्लस ला दिलेल्या मुलाखतीत यामीने तिच्या संघर्षमय काळाची आठवण सांगितली. यामी म्हणाली, “त्या काळात मला इंडस्ट्रीत माझे स्थान पक्के करता येत नव्हते. लोक म्हणायचे की तुला तुझी स्क्रीन प्रेझेन्स वाढवावी लागेल. १० मिनिटांच्या छोट्या भूमिका करून अनेक जण लोकप्रिय होत होते, आणि मी मात्र असुरक्षिततेत अडकले होते. आत्मविश्वासही खचला होता.”
यामी Yami Gautam पुढे म्हणाली, “माझ्या कुटुंबीयांनीदेखील मला समजावले की तू प्रयत्न केलेस, ते खूप चांगले आहे. त्यावेळी मी ठरवले की मी अशी कोणतीही भूमिका स्विकारणार नाही जी मला मनापासून नको आहे. नाहीतर मी माझ्या बॅगा बांधून परत गावी जाईन आणि शेती करेन.”या संघर्षानंतर यामीच्या आयुष्यात ‘बाला’ आणि ‘उरी’ सारखे यशस्वी चित्रपट आले आणि तिच्या करिअरला नवे वळण मिळाले. यामी शेवटची प्रतीक गांधी सोबत ‘धूम-धाम’ या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या वेगळ्या शैलीचं प्रेक्षकांनी विशेष कौतुक केलं.