मैत्रिणीसाठी हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याचा गेला जीव

गोरेवाडा जंगल परिसरातील रात्रीचा थरार

    दिनांक :16-Jun-2025
Total Views |
नागपूर,
Gittikhadan Nagpur crime अतिप्रेमापोटी तो संशय घ्यायचा. मित्रावर ती प्रेम करते, असा त्याचा गैरसमज झाला. याच गैरसमजातून दोन मित्रांमधील वाद विकोपाला गेला. विनाकारण होत असलेल्या सततच्या वादाला कंटाळून मित्राने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. योजनाबद्ध रीत्या भेटायला बोलावून त्याची हत्या केली आणि पसार झाला. अमन ध्रुववंशी (20) रा. महाराणा अपार्टमेंट, स्वामीनगर, गोरेवाडा असे मृताचे नाव आहे.
 
 

Gittikhadan Nagpur crime  
ही थरार घटना शनिवारी रात्री गोरेवाडा हिल परिसरात घडली. मात्र हे हत्याकांड रविवारी दुपारी उघडकीस आले. घाबरलेल्या एका आरोपीने मानकापूर ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तीन आरोपींना अटक केली. लकी मेंढेवार (18) रा. गंगाबाई घाट, अभिषेक कटारिया (20) रा. गोरेवाडा आणि सुलभ ठाकूर (19) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन मुलास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
 
 
अमन शिमला येथील एका महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी होता. लकी आणि त्याचे मित्र खाजगी संस्थांमध्ये हाऊस किपिंगचे काम करतात. रीना (काल्पनिक नाव) सोबत अमनचे प्रेमसंबंध होते. अमनचा मित्र लकी हादेखील रीनाचा चांगला मित्र होता. मात्र, अमन विनाकारण गैरसमज करून घ्यायचा. त्याला संशय होता की, रीना आणि लकी यांच्यात प्रेमसंबंध आहेत, यावरून तो सतत तणावात असायचा.
शनिवारी रात्री लकीने रीनाच्या बनावट आयडीतून अमनला संदेश पाठवला. त्याला भेटण्यासाठी मिलिटरी मैदानात बोलावले. अमन तेथे पोहोचला. लकी आणि अभिषेकला पाहून दचकला. त्यांच्यात वाद झाला. अमनने समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन्ही आरोपी अमनला त्याच्याच दुचाकीवर बसवून गोरेवाडा जंगलातील टेकडीवर घेऊन गेले. दरम्यान सुलभ आणि अल्पवयीनही तेथे पोहोचले. चौघांनी मिळून अमनला मारहाण सुरू केली. त्याच दरम्यान लकीने चाकू काढून अमनच्या छातीत भोसकला. अमन रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळला. चारही आरोपी तेथून फरार झाले.
घाबरलेला अभिषेक पोहोचला ठाण्यात
रात्रभर चारही आरोपी घरीच होते. मात्र अभिषेकला घाबरला होता. घटना उघडकीस आली तर काय होईल, या भीतीने तो स्वत: मानकापूर ठाण्यात पोहोचला. अमन आणि लकीमध्ये झालेल्या वादाची माहिती दिली. गोरेवाडा जंगलात नेऊन त्याचा चाकूने खून केल्याची माहिती दिली. मानकापूरचे ठाणेदार हरीश कळसेकर पथकासह घटनास्थळी पोहोचले. अमनच्या मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवले. अभिषेकच्या कबुली जबाबावरून अन्य तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.