कर्ज फेडण्यासाठी उच्च शिक्षित युवक वळला चोरीकडे

नागपुरातील एका कंपनीत होता अभियंता

    दिनांक :17-Jun-2025
Total Views |
नागपूर, 
Ashish Reddymalla एम. टेक.पर्यंत त्याचे शिक्षण झाले. तो नागपुरातील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर होता. मात्र, त्याला जुगाराची सवय होती. त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. त्यामुळे नोकरी सोडून तो चोरीकडे वळला. नागपुरात त्याने अनेक ठिकाणी घरफोडी केली. धंतोली पोलिसांनी त्याला चंद्रपुरातून अटक केली. आशीष रेड्डीमल्ला (25) रा. चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आशीषचे शिक्षण चंद्रपुरात झाले. त्याला आई, वडील आणि एक भाऊ आहे. तो उच्च शिक्षित आहे. मिहान येथील एका कंपनीत तो सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कामाला होता. भाड्याने खोली घेऊन राहायचा. त्याला येथील वसाहतीची चांगलीच माहिती होती. त्याला जुगाराची सवय होती. बरेचदा कर्ज घेऊनही तो जुगार खेळायचा. त्यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. कर्जदार पैशांसाठी तगादा लावायचे. पगारात त्याला कर्जाची परतफेड करणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडून तो चंद्रपुरात निघून गेला.
 
 

theft 
 
 
दरम्यान त्याला चोरीची कल्पना सुचली. त्याने पहिल्यांदा चंद्रपुरातच चोरी केली आणि तो यशस्वी झाला. त्याची हमत वाढली अन्‌‍ तो चोरी करू लागला. त्याच्यावर चंद्रपुरात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला नागपुरातील विविध वसाहतींची माहिती होती. त्याने नागपुरात धंतोली, अजनी, सोनेगाव याठिकाणी घरफोडी केली. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिस त्रस्त होते. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीची ओळख पटविली. खबऱ्याच्या माध्यमातून त्याच्या घरापर्यंत पोहोचले.Ashish Reddymalla अटक करून त्याला नागपुरात आणले. त्याच्याकडून धंतोलीशिवाय दोन ठाण्याअंतर्गत सहा ठिकाणी घरफोड्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्या ताब्यातून रोख 15 हजार, 32 ग्रॅम सोने, 200 अमेरिकन डॉलर्स, शंभर युरो, लोखंडी रॉड असा एकूण 2 लाख 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सगल, पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे, उपनिरीक्षक मारकवाड, सुभाष वासाडे, योगेश चांभारे, अमोल लोणकर, मनोज सोनवने, मनीष दहिफळे, उत्तम सरकटे, भुनेश्वर मोहोड, ऋषभ निशितकर यांनी केली.
तक्रारीवरून गुन्हा दाखल
विकास नगर येथील रहिवासी फिर्यादी शीतल चित्तलवार (24) कुटुंबासह चंद्रपूरला गेल्या होत्या. ही संधी साधून आरोपीने मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील 22 हजार चोरले. त्यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.