Panchakosha मागील आठवड्यात अन्नमय कोश म्हणजे आपला स्थूलदेह किंवा आपले शरीर होय. याबाबत आपण चर्चा केली होती. अन्नमय कोशानंतर येणारा कोश म्हणजे प्राणमय कोश. ‘प्राण’ या शब्दावरूनच लक्षात येईल की, प्राणमय कोश किती महत्त्वाचा! प्राण गेला म्हणजे तो मनुष्य गेला. प्राण नसेल तर आपला देह मृत घोषित होतो. देह मृत झाला याची खात्री श्वासोच्छ्श्वास पाहून करतात. अजून सोपे केले तर प्राण गेला की नाही हे पाहण्यासाठी ढोबळमानाने नाकाजवळ बोट ठेवून श्वास चालू आहे का पाहतात. यावरून हे तर लक्षात येते की, आपला श्वासोच्छ्श्वास सुरू असेल तरच प्राण आहे आणि तो बंद झाला की प्राण गेला समजण्यासाठी लक्षात घेऊ की प्राणपाखरू उडाले म्हणजे प्राणमय कोश उडून गेला. याचा अर्थ अन्नमय कोशाच्या आत असलेला प्राणमय कोश आहे. प्राण म्हणजे श्वास बंद झाला की ते शरीर मृत झाले. अर्थात प्राण गेला.

आपल्या अन्नमय कोशाच्या आतील कोशाला प्राणमय कोश म्हणतात. यालाच सूक्ष्मदेह म्हणतात किंवा यालाच ऊर्जा शरीर असेही म्हणतात. हे ऊर्जा शरीर स्थूल शरीराला जिवंत ठेवते. प्राणमय कोश हा अन्नमय कोशाचे ऊर्जा कवच आहे. आपल्या स्थूलदेहाचे वर्तन होण्यासाठी लागणारी ऊर्जा प्राणमय कोश म्हणजे सूक्ष्मदेह देतो. जसे आपल्या घरातील शीतकपाट म्हणजे फ्रिज सुचारू राहण्यासाठी त्याची पिन विद्युत प्लगला जोडावी लागते अन्यथा तो फ्रिज केवळ ढाचा असेल. विद्युतशिवाय फ्रिज व्यर्थ. त्याप्रमाणेच अन्नमय कोशाला प्राणमय कोशाला जोडणे आवश्यक. दोहोतला संबंध तुटला तर ते केवळ मृत कलेवर राहील. ‘चाले हे शरीर कोणाचीये सत्ते’ तर त्याचे सामान्य उत्तर म्हणजे प्राणमय कोश म्हणता येईल. प्राणमय कोश म्हणजे चेतनऊर्जा आहे. प्राणमय कोश हा श्वासोच्छ्श्वासाने पुष्ट होतो, ज्याला आपण योगशास्त्रात प्राणायाम म्हणतो. प्राण म्हणजे वायू. असे 14 प्रकारांचे वायू आपल्या शरीरावर परिणाम करतात. यातील प्राणवायू, व्यान वायू, अपान वायू, उदान वायू आणि समान वायू हे पंचवायू महत्त्वाची भूमिका पंचकोश पुष्टीकरणात घेतात.
प्राणवायू श्वास क्रियेत असतो. तो शरीराला पुष्ट करतो. तो नाकापासून हृदयापर्यंत कार्यरत असतो. अपानवायू नि:श्वास क्रियेतून उत्सर्जन क्रिया अर्थात विषहरण करतात. तो नाभीपासून पायापर्यंत असतो. समान वायू आंतरिक गतिविधीमध्ये मानसिक विकासात मदत करतो. तो हृदयापासून नाभीपर्यंत असतो. उदान वायू स्वर उच्चारणात महत्त्वाची भूमिका घेतो. तो गळ्यापासून मस्तकापर्यंत असतो. व्यान वायू शरीर आकुंचन क्रियेत प्राण ऊर्जा शरीरात सर्वत्र पोहोचवतो आणि समन्वय साधतो. त्याचा संपूर्ण शरीरभर संचार असतो. प्राण म्हणजे हृदयाची धडकन होय. प्राणमय कोश अन्नमय कोशाची एका अर्थाने बॅटरी आहे. बॅटरी जर उतरली तर तो मोबाईल केवळ डब्बा तद्वतच प्राणमय कोशाशिवाय अन्नमय कोश म्हणजे प्रेत होय. खरं सांगायचं तर प्राणमय कोश हा अन्नमय कोश आणि मनोमय कोश यांना जोडणारा पूल आहे. कारण जेव्हा शारीरिक हालचाली वाढतात तेव्हाही प्राण वाढतो आणि मानसिक चढउतार झाला तरीही प्राण वाढतो. अन्नमय कोश तेव्हाच व्यक्त होतो किंवा वर्तन करतो जेव्हा आपला प्राणमय कोश सक्रिय असतो. आपले बोलणे म्हणजे श्वासच आहे.Panchakosha आपला स्थूल देह निरनिराळ्या क्रिया करते म्हणजे प्राणमय कोश त्या क्रिया ऊर्जा प्रदान करून करवून घेतो. ‘जितनी चावी भरी रामने’ ही कल्पना करा. यातील खिलौना म्हणजे अन्नमय कोश आणि चावीमुळे निर्माण झालेली ऊर्जा म्हणजे प्राणमय कोश.( गतिज आणि स्थितिज ऊर्जा) प्राणमय कोश म्हणजे सूक्ष्मदेह म्हणजे ऊर्जादेह.
ऊर्जेचे सहा प्रकार म्हणजे उष्णता, प्रकाश, विद्युत, चुंबकीय, ध्वनी आणि घर्षण होय. या सर्व ऊर्जा आपल्या शरीरात कार्यरत आहेत. हाच प्राणमय कोश होय. आपल्या शरीरात ‘प्राण’ आपल्या नेत्रात, हृदयात आणि मस्तिष्कात स्थित असतो. प्राचीन ऋषिमुनींनी यावर अनेक भाष्ये केलेली आहेत. तैत्तिरीय उपनिषदात महर्षी वरुण आणि भृगू संवादात प्राणच ब्रह्म म्हटले आहे.
प्राणो ब्रह्मेति व्यजानात । प्राणाद् एव खल्विमानि
भूतानि जायन्ते । प्राणेन जातानि जीवन्ति।
प्राणं प्रयन्त्यभिसंविशंतीति ।।
आपल्या शरीरात 72 हजार नाड्या आहेत. ईडा, पिंगळा, सुषुम्ना याबाबत आपण अनेकदा ऐकतो. प्राणमय कोशाला पुष्ट करण्यासाठी भ्रामरी, अनुलोमविलोम, भस्रिका, कपालभाती, शितली, उज्जयी, उद्गीथ इत्यादी श्वासक्रिया सांगितल्या आहेत. आपले जिवंत असणे किंवा मृत होणे हे प्राणमय शरीराच्या हातात आहे. हा कोश आपले ऊर्जा आवरण आहे. आपली जीवनशक्ती प्रवाहित करणारा हा कोश आहे. अन्नमय कोशानंतर असणारा हा दुसरा कोश असून सर्वांगीण विकासाचा प्राण म्हणजे प्राणमय कोश होय. प्राणतत्त्वालाच पंचप्राण म्हटले आहे. प्राणमय कोश आपल्या जिवंतपणाचे प्रमुख केंद्र आहे.
प्रा. दिलीप जोशी
9822262735