विद्यापीठ पदव्युत्तर विभागातील प्रवेश प्रक्रिया सुरू

प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार यांच्या हस्ते माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

    दिनांक :18-Jun-2025
Total Views |
नागपूर,
RTMNU राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्वायत्त पदव्युत्तर विभागातील २०२५-२६ या शैक्षणिक सत्राची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. शैक्षणिक सत्र २०२५-२६ च्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार यांच्या शुभहस्ते बुधवार, दिनांक १८ जून रोजी करण्यात आले.
 
 

RTMNU 
प्र-कुलगुरू कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात माहिती पुस्तक समितीचे अध्यक्ष तथा औषधी निर्माण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पुराणिक, सदस्य वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. अनंत देशमुख, पदव्युत्तर विधी विभाग प्रमुख डॉ. पायल ठावरे, लोकप्रशासन व स्थानिक स्वयंसहायित शासन विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र वासनिक, डॉ. रवींद्र जुगादे, सचिव तथा प्रकाशन अधिकारी प्रवीण गोतमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. विद्यापीठ स्वायत्त पदव्युत्तर विभागात प्रवेश घेण्याबाबत संपूर्ण माहिती या माहिती पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानव विज्ञान विद्याशाखा तसेच आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा या चारही विद्याशाखा अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या एकूण ३८ विभागांमधील प्रवेश क्षमता, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमाचे माध्यम, संपर्क क्रमांक आदी माहिती पुस्तकात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
प्रवेश RTMNU आरक्षण, सर्व साधारण सूचना, वसतिगृहाची माहिती, विविध अभ्यासक्रमाचे शुल्क, संशोधन विद्यार्थ्यांकरीता शुल्क, अभ्यासक्रम तसेच परीक्षा शुल्क, शिष्यवृत्ती, विद्यार्थी विकास निधी, विद्यापीठ आरोग्य केंद्र यासह महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील तरतुद १२७ नुसार विद्यार्थ्यांना अधिकार व शिस्तीबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभ्यासक्रम निहाय शुल्काची माहिती देखील माहिती पत्रकात उपलब्ध आहे. प्रवेशा करिता आवश्यक विविध प्रमाणपत्राचे नमुने, विभाग क्रमांक तसेच प्रवेश अर्जाचा नमुना देखील या माहिती पुस्तकात देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरिता विभागामध्ये स्वतंत्ररीत्या तसेच विद्यापीठ संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी केले आहे.
 
 

प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र क्यूआर कोड
 
 
प्रत्येक विभागाची स्वतंत्र माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी याकरिता प्रत्येक विभागाची माहिती क्यूआर कोड तसेच स्वतंत्र यूआरएल लिंकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आली आहे. संपूर्ण माहिती पत्रक विद्यापीठाच्या www.nagpuruniversity.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.