ओल्या केसांची योग्य काळजी : टाळा या चुका, वाचवा केसांचे नुकसान

    दिनांक :18-Jun-2025
Total Views |
मुंबई,
wet hair अनेकदा आपण केस धुतल्यानंतर त्यांची काळजी घेताना काही अशा चुका करतो, ज्या आपल्या नकळत केसांच्या आरोग्यास हानी पोहोचवतात. ओले केस हे कोरड्या केसांच्या तुलनेत अधिक नाजूक असतात आणि त्यांची संरचना त्या अवस्थेत कमकुवत झालेली असते. त्यामुळे ओल्या केसांना हाताळताना अधिक काळजी घेणे गरजेचे असते.
 
 
 
wet hair
केस धुतल्यापूर्वीच घ्या ही काळजी
 
 
आंघोळीपूर्वी केसांमधील गुंता नीट काढा. त्यामुळे केस धुताना अनावश्यक ताण येत नाही आणि केस मोडण्याची शक्यता कमी होते. जर केस खूपच गुंतलेले असतील, तर थोडेसे केसांचे सीरम किंवा तेल लावून मग ब्रशिंग करा. यामुळे केस मऊ होतात आणि गुंता सहज सुटतो.
 
 
शॅम्पूनंतर ओल्या केसांवर करू नका हे प्रयोग
शॅम्पू किंवा कंडिशनिंगनंतर अनेकजण ओल्या केसांवर जोरात कंगवा करतात, हे टाळा. त्याऐवजी लीव्ह-इन कंडिशनर लावून रुंद दात असलेला कंगवा किंवा डिटॅंगलिंग ब्रश वापरा. यामुळे केसांची तुटाफूट होणार नाही. तसेच ओले केस पोनीटेल किंवा बनमध्ये लगेच बांधू नका. ओल्या केसांची लवचिकता जास्त असल्यामुळे त्यांना घट्ट बांधल्यावर ते तुटू शकतात. केस सुकताना गाठी तयार होऊन आणखी नुकसान होऊ शकते. त्यामुळे ओल्या केसांसाठी क्लिप किंवा सैल वेणी हा उत्तम पर्याय आहे.
 
 
ब्लो-ड्रायर वापरताना घ्या विशेष खबरदारी
ओल्या केसांवर थेट ब्लो-ड्रायर वापरल्यास केसांचा नैसर्गिक ओलावा निघून जातो आणि केसांची क्यूटिकल्स तुटतात. त्यामुळे प्रथम मायक्रोफायबर टॉवेलने केसांतील जास्तीचा ओलावा हलक्या हाताने काढा आणि नंतरच मध्यम आचेवर ब्लो-ड्रायर वापरा. यामुळे केसांचा नैसर्गिक तजेला टिकून राहतो.
 
 
रात्री ओल्या केसांनी झोपणे टाळा
 
 
रात्री ओल्या केसांनी झोपल्यास केस तुटण्याची शक्यता वाढते आणि स्कॅल्पवर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे केस झोपण्यापूर्वी नीट कोरडे करा. मायक्रोफायबर टॉवेलने ओलावा काढून मग मध्यम आचेवर हलक्या हाताने केस ड्राय करा.
ओल्या केसांना योग्य प्रकारे हाताळल्यास केस गळणे, तुटणे आणि अन्य समस्यांना आपण सहज टाळू शकतो. त्यामुळे केस धुण्यापासून ते सुकवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर योग्य पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे.