नवी दिल्ली,
Kamal Haasan कमल हासन यांच्या ‘ठग लाईफ’ या चित्रपटाच्या कर्नाटकमधील प्रदर्शनावरून निर्माण झालेला वाद अखेर सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, न्यायालयाने कर्नाटक सरकारला कडक शब्दांत फटकारले आहे. न्यायालयाने राज्य सरकारला तातडीने चित्रपटाच्या प्रदर्शनास परवानगी देण्याचे निर्देश दिले आहेत.
५ जून रोजी देशभर प्रदर्शित झालेल्या ‘ठग लाईफ’ या चित्रपटावर कर्नाटकमध्ये बंदी घालण्यात आली होती. कमल हासन यांनी कन्नड भाषेबद्दल केलेल्या टिप्पणीमुळे हा वाद उफाळून आला होता. त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की, "कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला आहे," यामुळे काही गटांनी आक्षेप घेतला आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात आंदोलने आणि धमक्या दिल्या.
या Kamal Haasan प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने सांगितले की, एकदा चित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (CBFC) मान्यता मिळाल्यानंतर तो संपूर्ण देशात प्रदर्शित होणे आवश्यक आहे. राज्य सरकारचे कर्तव्य आहे की, अशा चित्रपटांचे प्रदर्शन सुरळीत होईल याची खात्री करावी.
खंडपीठाने स्पष्ट केले की, "कायद्याचे राज्य प्रस्थापित केले पाहिजे. चित्रपट पाहण्यासाठी लोकांच्या डोक्यावर बंदुका रोखता येणार नाहीत." तसेच, कमल हासन यांनी माफी मागावी, असा उच्च न्यायालयाचा सल्ला देखील सर्वोच्च न्यायालयाने अनुचित असल्याचे म्हटले. माफी मागणे हे वैयक्तिक बाब आहे आणि त्यावर न्यायालयाने निर्देश देऊ नयेत, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला एक दिवसाचा वेळ देत राज्यातील चित्रपट प्रदर्शनाची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर, उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करून गुरुवारी पुढील सुनावणी होणार आहे.‘ठग लाईफ’ चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले असून, हा चित्रपट देशभरातील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, कर्नाटकमध्ये तो अद्याप प्रदर्शित झालेला नाही.