मयुरीचे प्रेरणादायी सुयश

‘नीट’मध्ये मिळवले 527 गुण

    दिनांक :18-Jun-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा दारव्हा,
NEET exam तालुक्यातील ग्रामीण भागातील टाकळी या गावातील मयुरी उमेश इंगोले हिने नीट परीक्षेमध्ये 527 गुण संपादन केले आहेत. तिने पहिल्याच प्रयत्नात ‘ऑल इंडिया रँक’ 25943 मिळविला आहे, हे विशेष.
 
 

NEET exam 
मयुरीचे वडील उमेश इंगोले टाकळी येथील सामान्य शेतकरी आहेत. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. आई अश्विनी यासुद्धा माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या आणि टाकळीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार कर्मचारी आहेत.
 
आर्थिक स्थिती जेमतेम, परंतु मुलीला उच्च शिक्षण देऊन तिला डॉक्टर बनवण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. विजय काळे यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी आपल्या ध्येयाचा टप्पा गाठला. ग्रामीण भागात मुलांना इंग्रजी विषयाची भीती असते. प्रथम ती भीती काळे यांनी प्राथमिक शिक्षणात नाहीशी केली. पुढे माध्यमिक शिक्षण कोणतीच शिकवणी न लावता तिने चांगल्या गुणांनी पूर्ण केले. यावेळी जिजामाता हायस्कूलच्या शिक्षक पंकजा काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
 
 
पुढे नांदेड येथे 75 टक्के शिष्यवृत्तीवर तिची निवड आरसीसी नीट क्लासेसमध्ये झाली आणि पहिल्याच प्रयत्नात मयुरीने 527 गुण मिळवून यश संपादन केले. केवळ जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि मेहनत या जोरावर मयुरीने हे यश मिळवले आहे.टाकळी येथे मयुरी इंगोलेच्या घरी जाऊन तिचे शिक्षक विजय काळे, खेळ व क्रीडा शिक्षक श्याम पांडे व ओंकार निमकर यांनी कौतुक केले. तिच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
 
 
सत्काराला उत्तर देताना मयुरीचे वडील उमेश व आई अश्विनी इंगोले भावोक झाले. त्यांनी विजय काळे व पंकजा काळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले, मुलीला मानसिक आधार दिला, मोठ्या भावाप्रमाणे भक्कमपणे उभे राहिले, याकरिता त्यांचे आभार मानले. मयुरीने आपल्या यशाचे श्रेय आईवडील आणि शिक्षकांना दिले आहे.