मुंबई,
Abhishek Bachchan अभिनेता अभिषेक बच्चन नुकताच ‘हाऊसफुल 5’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक झालं. मात्र, या यशानंतर अभिषेक एका भावनिक पोस्टमुळे चर्चेत आला आहे. अभिषेकने सोशल मीडियावर एक विचारप्रवर्तक पोस्ट शेअर करत स्वतःच्या भावना व्यक्त केल्या, ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
‘मैं एक बार लापता होना चाहता हूँ, भीड़ में खुद को फिर से पाना चाहता हूँ। जो कुछ भी था, सब दे दिया अपनों के लिए, अब जरा सा वक्त, बस अपने लिए चाहता हूँ।’“मला एकदा बेपत्ता व्हायचंय. लोकांच्या गर्दीत पुन्हा स्वत:लाच भेटायचं आहे. जे काही होतं, ते सर्व मी माझ्या जवळच्या माणसांना दिलं, आता फक्त थोडीशी वेळ मला माझ्यासाठी हवी आहे.”
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिषेकने लिहिलं
“कधी कधी स्वत:ला भेटण्यासाठी सर्वांपासून ‘missing’ व्हावं लागतं.”
अभिषेकच्या Abhishek Bachchan या पोस्टवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत त्याला धीर दिला आहे. “तू एक तारा आहेस आणि सदैव चमकत राहशील, हीच आमची प्रार्थना आहे,” असं एका चाहत्याने लिहिलं आहे. तर, “तू कबड्डीसाठी खूप काही केलं आहेस. काही दिवसांसाठी हिमाचल प्रदेशला ये, तुला नक्कीच शांतता मिळेल,” असा सल्ला दुसऱ्याने दिला आहे. काहींनी त्याला पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलीसोबत सहलीला जाण्याचा सल्ला दिला आहे, तर काहींनी सोलो ट्रिपचा पर्याय सुचवला आहे.
अभिषेक सहसा वैयक्तिक भावना सोशल मीडियावर व्यक्त करत नाही. तो बहुतांश वेळा त्याच्या प्रोजेक्ट्सचं प्रमोशन किंवा प्रेरणादायी पोस्ट शेअर करताना दिसतो. त्यामुळे त्याची ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांमध्ये आश्चर्य आणि चिंता निर्माण झाली आहे.