नागपूर,
Itwari-Umred-railway line : इतवारी ते नागभीड रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा इतवारी ते उमरेड पर्यंतच्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढील महिन्यात इतवारी-उमरेड रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. प्रारंभी या मार्गावर मालवाहतूक जाणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. या मार्गावर पुढील जुलै महिन्यात रेल्वे धावणार असल्याने रेल्वे सुरक्षा आयुक्त जूनच्या अखेरीस या मार्गाची पाहणी करणार आहे. नॅरोगेजचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये होत असल्यामुळे अनेकांना रेल्वे मार्गाचा लाभ मिळणार आहे.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने इतवारी-उमरेड (५५ किमी) पर्यंत रेल्वेमार्गाचे काम केले आहे. आता या मार्गाचे निरीक्षण रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून निरीक्षण होताच जुलै महिन्यात हा रेल्वेमार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. कोळशाच्या वाहतुकीसाठी हा अधिक सुलभ ठरणार आहे. इतवारी-नागभीड या १०६ किलोमीटर रेल्वे मार्गाचे (ब्रॉडगेज) काम आहे. त्यापैकी इतवारी-उमरेडपर्यंत ५५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच उमरेड ते भिवापूर (१२ किमी) काम अंतिम टप्प्यात आहे. हा संपूर्ण प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.