अरण्यऋषी विसावला...मारुती चितमपल्ली यांचे निधन

    दिनांक :19-Jun-2025
Total Views |
सोलापूर, 
Maruti Chitampally passes away पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती भुजंगराव चितमपल्ली यांचे वृद्धापकाळाने सोलापुरात निधन झाले. वयाच्या 93 वर्षी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला. 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीतून परतल्यापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते आजारीच होते. अखेर, बुधवार, 18 जून रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
 
 

Maruti Chitampally passes away 
 
 
अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मनिधारी एम्पायर सोसायटी येथील निवासस्थानापासून त्यांची अन्त्ययात्रा निघणार आहे. त्यांच्यावर रूपाभवानी मंदिराजवळील हिंदू स्मशानभूमीवर अन्त्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात भावजय, दोन पुतणे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास ते दिल्लीला गेले होते. त्या प्रवासामुळे त्यांना कमालीचा थकवा जाणवत होता.
गेल्या दहा दिवसांपासून त्यांनी अन्न घेणे बंद केले होते. दिवसभरात ते तीन वेळा दूध घेत असे. बुधवारी सायंकाळी त्यांनी अर्ध्या ग्लास पाणी प्राशन केले होते. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932, सोलापूर येथे झाला. त्यांच्या कार्यामुळे आणि जंगलावरील अगाध प्रेमामुळे ‘अरण्यऋषी‘ म्हणून ओळखले जाते.
 
 
मारुती चितमपल्ली यांनी वन खात्यात 36 वर्षे सेवा केली. त्या काळात देशभर संशोधकवृत्तीने भटकंती केली. त्यांनी एकूण 5 लाख किमी प्रवास केला. मारुती चितमपल्ली यांना 13 भाषांचे ज्ञान होते. त्याद्वारे आदिवासी व इतर जमातींशी संवाद साधत त्यांनी पर्यावरणाशी संबंधित मोठी माहिती मिळवली. त्या माहितीची नोंद केलेल्या आणि 30 वर्षे जपून ठेवलेल्या शेकडो डायèया आहेत. डायरीतील नोंदीला शास्त्रीय आधार देत पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन पूर्ण केलं. अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पेक्षा जास्त पुस्तके चितमपल्ली यांनी लिहिली. निसर्गातील हा ठेवा समाजाला कळावा या भावनेतून सतत कार्यरत हा सकारात्मक विचाराचा ऊर्जाकोश म्हणजे विख्यात लेखक मारुती चितमपल्ली. सोलापूरच्या गिरणी कामगारांच्या घरात जन्मलेल्या चितमपल्ली यांना त्यांच्या जंगल आणि पक्ष्यांविषयीच्या अभ्यासामुळे अरण्यऋषी म्हणून ओळखले जात होते. वनाधिकारी म्हणून सरकारी नोकरी करतानाच त्यांनी वन, वन्यजीव आणि पक्षीशास्त्र या विषयांवर विपुल लेखन केले. त्यांनी पक्षी कोश तयार करायला देखील स्वत:ला वाहून घेतले होते. एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान यंदा पद्म पुरस्कारानं करण्यात आला होता.
 
 
मारुती चितमपल्ली यांनी सहा दशकांहून अधिक काळ मराठी लेखल, वन्यजीव संशोधन आणि पर्यावरण जागरुकता केली होती.त्यांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदीही भूषवले होते. Maruti Chitampally passes away वन, वन्यजीव आणि पक्षिशास्त्र या विषयांवर 20 हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली होती. मराठी आणि इतर भाषांमधील पक्षी, प्राणी (प्राणी कोश) आणि झाडे (वृक्ष कोश) आदी शब्दकोशांचे काम केले होते. पक्षी जाय दिगंतरा (1981) आणि रानवाटा (1991) सारख्या उत्कृष्ट कलाकृती त्यांनी निर्माण केल्या होत्या. वन सेवा अधिकारी म्हणून ते नोकरी करीत होते. 1990 पर्यंत संचालक व्याघ्र प्रकल्प म्हणूनही काम करताना त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नागझिरा अभयारण्य आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यान यासारख्या प्रमुख वन्यजीव अभयारण्यांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 
 
मारुती चितमपल्ली यांच्या निधनाची वार्ता माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. 1980 पासून त्यांच्याशी माझा संबंध आहे. परवाच त्यांच्या पुतण्याशी बोलून प्रकृतीची विचारपूस केली होती. खरे तर त्यांचे साहित्य वाचून लोकं निसर्ग पर्यटनाकडे वळले, असे म्हणावे लागेल. मारुती चितमपल्ली यांनी एक निसर्ग दालन तयार केले. आज देशाने एक निसर्गमित्र गमावला आहे.
मकरंद कुलकर्णी, प्रकाशक, साहित्य प्रसार केंद्र
 
 
मारुती चितमपल्ली यांच्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर त्यांच्या आठवणींनी मन भरून आले. आम्ही दोघे खूप वर्षे एकमेकांच्या सहवासात वावरलो. माझे घर त्यांच्या घराशेजारी असल्याने त्यांचा खूप मोठा सहवास लाभला. निसर्ग त्यांच्या रोमारोमात वसला होता. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी लिहिलेल्या निसर्ग साहित्याच्या रूपात कायम आपल्यासोबत राहतील.
डॉ. अनिल पिंपळापुरे, पक्षीतज्ज्ञ
 
 
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली सरांचे निधन हे माझ्यासाठी आणि वनांवर प्रेम करणाèया सर्वांसाठी दुःखद आहे. त्यांच्या पुस्तकांमधून नवेगाव, नागझिरासह विदर्भातील एकूणच वनांचे आणि वन्यप्राण्यांचे जीवन याविषयी अतिशय सखोल आणि मर्मज्ञ स्वरूपाची माहिती चितमपल्ली सरांनी संकलित करून ठेवलेली आहे. मराठी साहित्याला त्यांनी हाच फार मोठा ठेवा दिलेला आहे. त्यांचे साहित्य मराठीसाठी मर्यादित न राहता देशभर जावे त्यासाठी या साहित्याचे इंग्रजीमध्ये भाषांतर व्हावे असे मला वाटते. त्या दृष्टीने सर्वांनी मिळून विशेष प्रयत्न केल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- प्रभू नाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प