91 हजारांची ‘ऑनलाईन’ चोरी उघडकीस

19 Jun 2025 21:16:55
चंद्रपूर, 
Online theft : राज्य महामार्गावर मोटारसायकलवरून जात असलेल्या व्यक्तीला अडवून मोबाईल हिसकावून त्यातून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणार्‍या चोरट्यांना पडोली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत शिताफीने 24 तासांत बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून 2 लाख 8 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ऋषीकेश आंबोलकर व अनुज महाजन अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.
 
 
 
hjkh
 
 
 
16 जून रोजी रात्री 12.45 वाजता उमेश महंत साह (50, रा. भद्रावती) हे आपल्या दुचाकीने भद्रावतीकडे जात असताना मौजा साखरवाही फाट्याजवळ चार अज्ञात इसमांनी त्यांना मोटारसायकलवर अडवून मोबाईल जबरदस्तीने हिसकावला. या मोबाईलव्दारे 91 हजार रुपये एका अज्ञात खात्यावर ट्रान्सफर केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे साह घाबरले व त्यांनी पडोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 392 (जबरी चोरी) व इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून अवघ्या 24 तासात या गुन्ह्याचा छडा लावला.
 
 
याप्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश आंबोलकर, अनुज महाजन यांच्यासह दोन अल्पवयीन बालकांना अटक केली. आरोपींकडून 44 हजार रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चोरीच्या पैशातून खरेदी केलेले कपडे आणि 4 मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 8 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश हिवसे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील विनोद बानकर, कोमल मोहजे, प्रतीक हेमके, धीरज भोयर व सुचिता उमरे यांनी केली.
Powered By Sangraha 9.0