Maruti Chitampally 25 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी पद्म पुरस्कारांची घोषणा होत होती. श्री नरकेसरी प्रकाशन लि.चे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री मिळाली म्हणून डॉ. रवींद्र कोल्हे यांचा फोन आला. लगेच त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालो तर पुढचा फोन आला की मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री मिळाली. मी थोडा जमिनीवरून दोन तीन फूट उडालोच. कारण या तीनही पद्मश्रींसोबत माझा घरोबा आहे. लगेच डॉ. विलास डांगरे यांच्याकडे गेलो. त्यांचे मारुती चितमपल्ली यांच्यासोबत फोनवर बोलणे करून दिले. मुख्य म्हणजे डॉ. विलास डांगरे यांचे मारुती चितमपल्ली पेशंट होते. बरीच वर्षे त्यांना डॉ. डांगरेंकडे घेऊन जाण्याची व नंतर त्यांचे औषध सोलापूरला पाठवायची जबाबदारी असायची.
मी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आणि साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद कुलकर्णी असे आम्ही तिघे मारुती चितमपल्ली यांचे नागपूरमधील केअर टेकर होतो. नागपुरात मुक्कामी असताना त्यांच्या पत्नी व नंतर प्रसिद्ध लेखिका मुलगी छाया चितमपल्ली यांचे देहावसान झाल्यानंतर ते एकाकी पडले होते. तेव्हा आम्ही तिघेही मिळून त्यांची काळजी घेत होतो. तेव्हा तर त्यांनी नागपूरच्या वकिलाकडे मृत्युपत्र बनविले होते व आम्हा तिघांना अग्निसंस्काराचा अधिकार दिला होता. नागपुरात त्यांचे घर लक्ष्मीनगरात दुसऱ्या मजल्यावर होते व कधी कधी तर तापाने फणफणत असताना दार उघडायला सुद्धा त्यांना जमत नव्हते, तेव्हा पुढील देखभाल व्यवस्थित व्हावी म्हणून त्यांची व्यवस्था वर्धेच्या हिंदी विश्वविद्यालयामध्ये केली होती. अनायासे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा येथे मी कार्यकारी परिषदेवर सदस्य व नंतर प्रति कुलपतिपदावर कार्यरत असल्यामुळे त्यांची तेथे अतिथी लेखक म्हणून नियुक्ती केली होती. लेखकाचे मानधनही मिळायचे व त्यांची तेथील गेस्ट हाऊसवर निवास व्यवस्थाही झाली होती. तिथे त्यांचे लेखनकार्य तब्बल 27 महिने चालले व तेथील रिसर्च करणाèया विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा लाभ मिळाला. मारुती चितमपल्ली यांचा भरपूर सहवास व त्यांची सेवा करण्याचा लाभ मिळाला हे माझे सौभाग्य आहे. त्यांना घेऊन बèयाच जंगलात आम्ही फिरलो. नागझिरा, नवेगावबांध येथील माधवराव पाटील, किनवट येथील डॉ. बेलखोडे यांच्याकडे, माहूरच्या जंगलात, मेळघाटच्या जंगलात भरपूर फिरलो.
मेळघाटच्या आमच्या संस्कार शिबिरात ते मुक्कामी असायचे. एक वर्ष तर आमच्या 7 दिवसांच्या सायकल यात्रेत ते पूर्ण दिवस गाडीने सोबत आले होते आणि वडाच्या झाडावर कलम कशी बांधायची म्हणजे मूळ झाडाच्या वयाचे पुढील कलम केलेले झाड तयार होईल हे विद्यार्थ्यांना सहज सांगत होते. त्याच कारणांमुळे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे, पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांच्याप्रमाणेच पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या सहवासाचे सौभाग्य मिळाले.
त्यांच्या खूप आठवणी व अनुभवाचे गाठोडे सोबत आहे. बऱ्याचदा मंचावरून त्यांची मुलाखत घेण्याची संधी सुद्धा मला मिळाली. जंगलात फक्त वाघ बघायला जाऊ नका तर बाकी पशु-पक्षींचे निरीक्षण कसे करायचे ते हे सुद्धा शिकवत होते. जंगलातील मुंग्यांचे वारुळ हे जंगलात वाट चुकलेल्या लोकांसाठी होकायंत्राचे काम कसे करतात हे बघायला शिकविले. दुष्काळात माकड कसे आपल्या पिलांसाठी तहान लाडू व भूक लाडू बनवून ठेवतात, थंडीमध्ये माकडे कशी शेकोटी भोवताल बसून लाकडे न जाळता शेकोटीची ऊब घेतात असे अनेक जंगलातल्या व निसर्गाच्या चमत्कारिक गोष्टी त्यांच्या साहित्यातून शिकायला मिळतात.
एकदा तर संभाजी नगरचे 37 मित्र त्यांच्या निमंत्रणावरून नागझिरा बघायला आलेले आणि मारुतराव पद्मश्री डॉ. विक्रम मारवाह यांच्या हॉस्पिटलला भरती होते. त्यांचे जंगलावरचे प्रेम इतके की, डॉ. मारवाहांना आग्रह करून, विशेष व्यवस्था करून दुसèया दिवशी आमच्यासोबत जुळले. रात्रभर सर्वांशी जंगलातील अनुभव सांगत होते आणि प्राण्यांच्या रात्रीच्या आवाजावरून आता जंगलात काय घडत आहे याचे चित्र उभे करून दाखवीत आणि जंगलातून परत आल्यावर पुन्हा डॉ. मारवाहांकडे भरती झाले.
पद्मश्री मिळाल्यावर पत्नीसह अनिल गडेकर. मंजूषा रागीट आणि मी फेब्रुवारीत सोलापूरला जाऊन भेटून आलो. त्यावेळेस वाटले नव्हते की ते इतक्या लवकर जातील. दिल्लीला पद्मश्री घेऊन आल्यानंतर त्यांची तब्येत ढासळली व काल हृदयाचा ठोका चुकविणारी बातमी मिळाली. मन सुन्न झाले. आपल्याला अग्निसंस्काराचा अधिकार देणारा बाप-माणूस गेल्याचे दुःख झाले . सकाळी पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांचा फोन आला. सर्व आठवणींना डॉ. डांगरे यांनी उजाळा दिला. त्यांच्यासोबत घालविलेल्या, क्षणांच्या आठवणी लिहायला घेतले तर मोठे पुस्तक होईल, एवढे त्यांच्यासोबतचे अनुभव व प्रसंग स्मृतिपटलावर येऊन गेलेत. मुलगा ले. कमांडर पार्थ आणि मुलगी डॉ. गायत्रीवर त्यांचा आशीर्वाद होता. त्यामुळे कोरोना काळात वर्धेला असताना तासन् तास गप्पा मारायचे आणि मुलांचे जीवन समृद्ध करत होते. पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या बèयाच आठवणी आहेत. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
डॉ. चंद्रकांत रागीट
पूर्व प्रति कुलपती,
हिंदी विश्वविद्यालय, वर्धा