अमर हुतात्मा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी

Dr.Shyama Prasad Mukherjee अखेरचा हा तुला दंडवत...

    दिनांक :23-Jun-2025
Total Views |
कानोसा
 
- अमोल पुसदकर
 
Dr.Shyama Prasad Mukherjee 5 ऑगस्ट 2019 रोजी भारताच्या संसदेने काश्मीरला लागू असलेले कलम 370 निष्प्रभ केले. हा ऐतिहासिक निर्णय होता. ‘एक देश में दो प्रधान, दो विधान, दो निशान, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे’ अशी घोषणा देत ज्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरमध्ये सत्याग्रह केला व आपले बलिदान दिले, त्या श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदानाचे व लाखो आंदोलकांच्या त्यागाचे या दिवशी सार्थक झाले. 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र झाला तेव्हा काश्मीरचे राजा हरि सिंह हे होते व त्यांनी पाकिस्तानात सामील व्हायचे की भारतात सामील व्हायचे याबद्दल कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता. याचा फायदा घेऊन पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले. राजा हरिसिंहांनी भारत सरकारकडे लष्करी मदतीची मागणी केली. परंतु राजा हरिसिंह जोपर्यंत भारतात सामील होण्याचा निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आपण लष्करी मदत करू शकणार नाही अशी भूमिका भारत सरकारने घेतलेली होती. शेवटी महाराजा हरि सिंह यांनी भारतामध्ये काश्मीरचे विलीनीकरण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.
 
 
 

Dr.Shyama Prasad Mukherjee 
 
 
 
Dr.Shyama Prasad Mukherjee काश्मीर विलीनीकरण कराराच्या वेळी काश्मीरला विशेष दर्जा असावा ज्यामध्ये काश्मीरला वेगळा ध्वज, संविधान आणि तिथल्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान संबोधले जावे अशी शेख अब्दुल्लांची मागणी होती. भारताला केवळ संरक्षण, परराष्ट्र व दळणवळण यासंबंधी कायदे करण्याचा सीमित अधिकार यामुळे राहणार होता, तर उर्वरित सर्व अधिकार काश्मीरकडेच राहणार होते. या विशेष दर्जाला डॉ. आंबेडकरांसहित अनेक राष्ट्रवादी नेत्यांचा विरोध होता. 21 ऑक्टोबर 1951 रोजी भारतीय जनसंघाची स्थापना झाली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी सरकारच्या काश्मीरला विशेष दर्जा देण्याच्या निर्णयाला विरोध केला व त्यावेळेस त्यांनी घोषणा केली की ‘एक देश में दो प्रधान, दो विधान, दो निशान, नहीं चलेंगे, नहीं चलेंगे.’ सरकारच्या या निर्णयाच्या विरोधामध्ये त्यांनी देशव्यापी आंदोलन सुरू केले याचाच एक भाग म्हणून त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची ही भूमिका पंडित नेहरू यांना आवडलेली नव्हती.
 
 
Dr.Shyama Prasad Mukherjee सत्याग्रह व अटक : पठाणकोट व अमृतसरमार्गे ते माधवपूर नावाच्या चौकीवर पोचले जेथून जम्मू-काश्मीर राज्याची हद्द सुरू होत होती. त्या चौकीवर त्यांना थांबवण्यात आले व त्यांना अटक करण्याचा सरकारी आदेश दाखविण्यात आला. त्यावेळेस टेकचंद आणि गुरुदत्त नावाच्या दोन सहकाऱ्यांना घेऊन श्यामाप्रसाद यांनी स्वतःला अटक करवून घेतली व इतर साथीदारांना त्यांनी भारतात परत पाठवले. यामध्ये अटलबिहारी वाजपेयी सुद्धा होते. त्यांना परत पाठवताना श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणाले की, अटलजी, तुम्ही येथून परत जा व देशाला सांगा की जम्मू-काश्मीरला भारताचे अभिन्न अंग बनविण्यासाठी मी सत्याग्रह करीत स्वतःला अटक करवून घेतलेली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जींना अटक झाली ही बातमी ज्यावेळेला संपूर्ण देशांमध्ये पसरली त्यावेळेला संपूर्ण देश पेटून उठला. जागोजागी निदर्शने, सभा, मोर्चे, निघू लागले.
 
 
 
Dr.Shyama Prasad Mukherjee बंदिवास व प्रकृती अस्वास्थ्य : श्यामाप्रसाद मुखर्जींना श्रीनगरमधील दल झीलच्या जवळ एका बंगल्यात 12 मे 1953 ला बंदी म्हणून ठेवण्यात आले. त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू जरी देण्यात येत होत्या तरी पण श्यामाप्रसादांचे मन भारतात चाललेल्या विविध घटनांबद्दल अधिक आसक्त होते. त्यांना जम्मूतील सत्याग्रह आणि काश्मीरमधील जनतेच्या बातम्या ऐकण्यात विशेष रुची होती. परंतु अब्दुल्ला सरकार त्यांना वर्तमानपत्र सुद्धा पाच-सहा दिवस जुने वाचायला देत असे. त्यांच्याकडे आलेले पत्र सुद्धा त्यांना लवकर देण्यात येत नसे. त्याचप्रमाणे त्यांनी पाठवलेले पत्र सुद्धा लोकांना खूप उशिराच मिळायचे. त्यांना रोज सकाळ-संध्याकाळी फिरण्याची आवड होती आणि सवय होती. तर त्या ठिकाणी त्यांच्या फिरण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आलेली होती. काही संसद सदस्यांनी तथा वकिलांनी श्यामाप्रसाद मुखर्जींना भेटण्याचा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला. परंतु तो सुद्धा मान्य झाला नाही. अशा वातावरणात राहिल्याने त्यांचे स्वास्थ्य प्रतिदिन खराब होत चाललेले होते. पायामध्ये दुखणे, ताप येणे, भूक कमी होणे असे प्रकार सुरू झाले होते.
 
 
 
 
Dr.Shyama Prasad Mukherjee 18 जूनला उच्च न्यायालयाचे वकील उमाशंकर त्रिवेदी त्यांना भेटले. त्यावेळेला अतिशय सुदृढ शरीराचे श्यामाप्रसाद मुखर्जी अत्यंत कृश व रोगी दिसत होते. 19 जूनला प्रजा परिषद पक्षाचे नेते प्रेमराज डोंगरा यांनी पण त्यांची भेट घेतली. ते सुद्धा श्यामाप्रसादजींची तब्येत पाहून आश्चर्यचकित झाले. 20 जूनला अली मोहम्मद नावाच्या डॉक्टरांना बोलविण्यात आले. त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींना स्टेप्टोमाईसीन हे इंजेक्शन देण्याचे ठरविले. त्या इंजेक्शनबद्दल मुखर्जींना माहिती होती. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना सांगितले की, हे इंजेक्शन मला लागू होत नाही व माझ्या तब्येतीला हे घातक आहे. तरीसुद्धा डॉ. अली मोहम्मद म्हणाले की, मी डॉक्टर आहे व या इंजेक्शनबद्दल मी तुमच्यापेक्षा अधिक जाणतो. असे म्हणून त्यांनी त्यांना ते इंजेक्शन दिले. दुसऱ्या दिवशी श्यामाप्रसाद मुखर्जींवर हृदयविकाराचा आघात झाला. तरीसुद्धा एक सामान्य नवीन डॉक्टर झालेल्या मुलाला त्यांच्याकडे पाठविण्यात आले. त्यानंतर डॉ. अली मोहम्मद हे आले व त्यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींना इस्पितळामध्ये घेऊन जाण्याची सूचना केली.
 
 
Dr.Shyama Prasad Mukherjee बलिदान : वास्तविक पाहता एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून जर इतका मोठा नेता आजारी होता तर काश्मीर सरकारने त्यांना त्याच वेळेस इस्पितळामध्ये ठेवून त्यांची सेवा शुश्रूषा करायला पाहिजे होती. परंतु कदाचित अब्दुल्ला सरकारच्या मनामध्ये निश्चितच काहीतरी खोट होती. पं. नेहरूंनी सुद्धा देशाचा इतका सन्माननीय नेता काश्मीरमध्ये कैदेत असताना व त्याची प्रकृती अत्यंत खराब असताना त्यांच्याकडे कोणतेही लक्ष दिले नाही. तेथील न्यायालयात उच्च न्यायालयाचे वकील उमाशंकर त्रिवेदी यांनी श्यामाप्रसादजींना बंदिवासातून मुक्त करण्यासाठी याचिका दाखल केली व त्यावर युक्तिवाद सुद्धा केला. त्यानंतर ते नर्सिंग होममध्ये श्यामाप्रसादजींना भेटायला आले व त्यांना सांगितले की, कदाचित उद्या तुम्हाला न्यायालयाच्या आदेशाने सोडले जाईल. त्यावेळेसही श्यामाप्रसादजींनी वकिलांशी व्यवस्थित बोलणे केले व काही कागदांवर हस्ताक्षर सुद्धा केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला श्यामाप्रसादजींसोबत असलेले त्यांचे दोन साथीदार गुरुदत्त व टेकचंद यांच्यासमवेत वकील उमाशंकर त्रिवेदी व प्रेमनाथ डोंगरा हे नर्सिंग होममध्ये पोहोचले त्यावेळेस प्रशासनाने त्यांना सांगितले की, आज 23 जून 1953 ला पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी श्यामाप्रसादजींचा स्वर्गवास झालेला आहे. ही गोष्ट ऐकल्यावर सर्वच लोक स्तब्ध राहिले. सर्वांना धक्का बसला.
 
 
Dr.Shyama Prasad Mukherjee अखेरचा हा तुला दंडवत : पाहता पाहता ही बातमी संपूर्ण देशांमध्ये पसरली. संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. श्रीनगरवरून त्यांचे पार्थिव अंबाला येथे आणण्यात आले व तिथून विमानाने कोलकाता येथे नेण्यात आले. आपल्या प्रिय नेत्याला भेटण्यासाठी लाखोच्या संख्येने लोक जमा झाले. हा एकमात्र नेता असा होता ज्यांनी भारत ज्या वेळेला पारतंत्र्यात होता, त्यावेळेला त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. देशाच्या विभाजनाच्या वेळेला सुद्धा बंगाल, पंजाब व आसाम हे भारतातून पूर्ण पाकिस्तानात जाऊ नये यासाठी खूप मोठे जनआंदोलन उभारले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जम्मू-काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे या एकाच मागणीसाठी त्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले. लोकशाही जिवंत राहण्यासाठी भारतीय जनसंघ नावाच्या एका सशक्त विरोधी पक्षाचे निर्माण सुद्धा त्यांनी केले होते. देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी एखाद्या राजकीय नेत्याने केलेले हे सर्वोच्च कार्य व सर्वोच्च बलिदान होते. आणि म्हणूनच श्यामाप्रसाद मुखर्जी हे खरोखरच भारतमातेचे सुपुत्र होते.