आ. राजेश बकाने यांचा बोगस बियाणांवर कडक पवित्रा

23 Jun 2025 21:26:14
संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी
 
वर्धा,
MLA Rajesh Bakane शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या बोगस व उगवण क्षमतेअभावी अयशस्वी ठरत असलेल्या सोयाबीन बियाण्यांच्या विक्रीबाबत जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त असताना या गंभीर विषयावर आमदार राजेश बकाने यांनी थेट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांना धारेवर धरले. त्यांनी पालकमंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी, आमदार समीर कुणावार व आमदार सुमित वानखेडे यांच्या समोरच अधिकार्‍यांना कडक शब्दांत जाब विचारला.
 
 
MLA Rajesh Bakane
 
बैठकीत आमदार बकाने यांनी प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या तक्रारी व दाखले सादर करत सोयाबीन बियाण्याचे उगम नमुने दाखवले. या बियाण्यांमुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले असून अशा बोगस कंपन्यांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत खडसावले. MLA Rajesh Bakane यावेळी त्यांनी संबंधित बियाणे कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. दोषींवर कारवाई झाली नाही तर शेतकर्‍यांबरोबर रस्त्यावर उतरून आंदोलन करू. कृषी विभागातील दुर्लक्ष आणि निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यत करीत तातडीने चौकशी करून दोषींना निलंबित करण्याचे निर्देश द्यावे, अशीही मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पालकमंत्री पंकज भोयर यांनीही कारवाईचे संकेत दिले. आमदार समीर कुणावार व आमदार सुमित वानखेडे यांनीदेखील शेतकर्‍यांच्या हितासाठी तातडीने योग्य निर्णय घेण्याचे आवाहन प्रशासनाला केले.
Powered By Sangraha 9.0