नागपूर,
Missing deaf-mute मध्यरात्रीचा अंधार, दूरदूरपर्यंत माणसाचा पत्ता नाही. मात्र, निर्मनुष्य रस्त्याने जाताना त्या मूक-बधिर चिमुकल्यांना भीती वाटत नव्हती. इकडे पोलिस त्यांच्या शोधासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. त्यांच्यासाठी संपूर्ण वस्ती जागी होती. पाण्यात बुडाल्याचा संशय व्यक्त करून स्थानिक युवकाने पाण्यात उडी घेऊन खोलपर्यंत पाहणी केली. मात्र, चिमुकले आढळले नाहीत. अखेर मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन्ही मूक-बधिर चिमुकले रेल्वे मार्गावर सापडले. पोलिसांनी त्या दोघांनाही पालकांच्या स्वाधीन केले. चिमुकले आईच्या कुशीत येताच नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याअंतर्गत घडली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हरीशकुमार बोराडे आणि त्यांच्या पथकाने पाच तासांत मुलांना शोधले.
दोन्ही मुले बिहार येथील रहिवासी आहेत. मुलगा 5 वर्षांचा, तर मुलगी 6 वर्षांची आहे. सहा वर्षांची मुलगी आईसोबत मामाच्या घरी आली, तर पाच वर्षांचा मुलगा मामासोबत उपचारासाठी आला. दोन्ही चिमुकल्यांचे नातेवाईक शेजारी राहतात. रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दोघेही घरासमोर खेळत होते. खेळता-खेळता अचानक दोघेही बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी दोघांचाही शक्य त्या ठिकाणी शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. अखेर रात्री 9 वाजता कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. वाठोडा पोलिसांनी तत्काळ दोन्ही मुलांच्या वर्णनाची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच एसीपी नरेंद्र हिवरे आणि वाठोडाचे ठाणेदार हरीशकुमार बोराडे घटनास्थळी पोहोचले. पथकांचे गठन करून मुलांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले. आसपासच्या पोलिस ठाण्यांमध्येही माहिती देण्यात आली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी उद्घोषणा प्रणालीच्या माध्यमातून लोकांना मुलांबाबत माहिती दिली. नागरिकही मदतीसाठी पुढे सरसावले.
खड्ड्यात जमलेल्या पाण्यातही घेतला शोध
एका महिलेने घटनास्थळापासून जवळपास एक किमी अंतरावर असलेल्या रेल्वे पुलाखालील मोठ्या खड्ड्यात जमलेल्या पाण्याजवळ दोन्ही मुलांना खेळताना पाहिले होते. तिने पोलिसांना माहिती दिली. पोलिस तेथे पोहोचले. त्या ठिकाणी मुलांच्या पाऊलखुणा तर होत्या. मात्र मुले नव्हती. त्यामुळे मुले खड्ड्यात बुडाली तर नाही असा संशय निर्माण झाला. स्थानिक नागरिक गुड्डू शेवणे यांनी वेळ न दवडता खड्ड्यात उडी घेतली.Missing deaf-mute पाण्यात खोलवर जाऊन पाहणी केली. परंतु मुले बुडाली नव्हती. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रेल्वेमार्गाजवळ सापडले
या दरम्यान मुलांची माहिती आसपासच्या परिसरात पोहोचली होती. एका व्यक्तीला माहिती मिळाली की, दोन मुले छतरपूर फार्म्सच्या दिशेने गेली आहेत. त्याने तत्काळ पोलिसांना सूचना दिली. पोलिस आणि नागरिक तेथे पोहोचले. उमिया परिसरातील रेल्वे रुळाजवळ दोन्ही मुले सुखरूप खेळताना दिसली. भटकलेली मुले आपल्या घराऐवजी रेल्वे लाईनवरून विरुद्ध दिशेने जात होती. मुलांचा शोध घेण्यासाठी वाठोडा पोलिसांसोबतच सक्करदरा आणि पारडी पोलिसांनीही सहकार्य केले. तसेच स्थानिक नागरिक सचिन ढोमणे, प्रज्वल वासनिक यांनी पोलिसांना सहकार्य केले.