नागपूर,
Municipal Elections : महापालिका निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने अकरा दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात बदल केला आहे. गुगल मॅपवर तयार केलेल्या प्रभागाच्या हद्दी तपासण्यासाठी जवळपास एक महिना दिला असल्यामुळे अंतिम प्रभाग रचना आता सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये जाहीर होईल. परिणामी, पुढील प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने नवीन वर्षात निवडणूक होण्याची शक्यता आहे.
नगरविकास विभागाने 12 जून रोजी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात प्रगणक गटांची मांडणी, माहिती तपासणीचा कालावधी 'जैसे थे' आहे. 23 जूनपर्यंतची स्थळ पाहणी 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. पूर्वीच्या कार्यक्रमानुसार 24 ते 30 जूनपर्यंत गुगल मॅपवर नकाशे तयार करून हद्द तपासणी केली जाणार होती. या प्रक्रियेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. नव्या कार्यक्रमानुसार एक ते पाच जुलैदरम्यान गुगल मॅपवर नकाशा तयार करून सहा जुलैपासून 24 जुलैपर्यंत हद्द तपासणी केली जाणार आहे. त्याला एक महिना देण्यात आला आहे.
जुन्या कार्यक्रमानुसार 1 ते 3 जुलैपर्यंत प्रभागरचना मसुद्यावर समितीने स्वाक्षèया करून 8 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवायचे होते. त्यानंतर 15 ते 21 जुलैपर्यंत रचना प्रसिद्ध करून हरकती मागवून 22 ते 31 जुलैपर्यंत सुनावणी घ्यायची होती. 1 ते 7 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी पाठवून 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान अंतिम प्रभागरचना जाहीर करायची होती.
नवा कार्यक्रम असा
नवीन कार्यक्रमात मसुदा तयार करून समितीच्या सह्यांचा कालावधी 25 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आला आहे. नगरविकास विभागाला 8 ते 12 ऑगस्?टपर्यंत प्रारूप प्रभाग रचना पाठवायची आहे. नगरविकासकडून राज्य निवडणूक आयोगाला 13 ते 25 ऑगस्टपर्यंत प्रभाग रचना पाठवली जाईल. प्रारूप प्रभाग रचना 3 ते 8 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करून हरकती मागवल्या जाणार आहेत. त्यावर 9 ते 18 सप्टेंबरदरम्यान सुनावणी घेऊन 22 सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना मंजुरीसाठी पाठवायची आहे. ती 29 सप्टेंबरपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे. त्यानंतर 9 ते 13 ऑक्टोबरदरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.
जानेवारी-फेब्रुवारीत मतदान
वाढवलेल्या कालावधीमुळे प्रभाग रचनेनंतर एक महिना प्रभाग आरक्षण सोडतीसाठी लागणार आहे. त्याचे गॅझेट होऊन मतदार याद्यांची फोड, प्रारूप मतदारयाद्या, त्यावर हरकती-सूचनांनंतर अंतिम मतदारयाद्या तयार होतील. यासाठीही महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतर निवडणुकीचा अंतिम कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.