पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना आज श्रद्धांजली

24 Jun 2025 22:02:05
वर्धा,
Maruti Chitampally पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या अस्थी आज मंगळवार 24 रोजी वर्धेत आल्या असून नागरिकांना अस्थींचे दर्शन घेण्याचा व त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम बुधवार 25 रोजी वर्धा वनविभागाच्या नर्सरीत (वनपरिक्षेत्र कार्यालय, जे.बी. सायन्स महाविद्यालयाच्या जवळ) करण्यात आला आहे. पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचे 18 जून 2025 रोजी सोलापूर येथे निधन झाले. पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचा जवळपास साडेतीन वर्षाचा काळ वर्धेत गेला. ते महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापिठात आवासीय लेखक म्हणून वास्तव्यास होते.
 
 
Maruti Chitampally
 
 
या काळात त्यांचे वर्धेतील पर्यावरण प्रेमी व वर्धेकर जनतेशी ऋणानुबंध जुळून आले. वर्धेतील वन्यजीव प्रतिपालक कौशल मिश्र यांच्याकडे मारुती चितमपल्ली यांच्या अस्थी चितमपल्ली यांचे पुतणे श्रीनिवास व श्रीकांत चितमपल्ली यांच्या मार्फत पाठविण्यात आल्या. अस्थींचे दर्शन घेण्यासाठी वर्धा वनविभागाच्या नर्सरीत (जे. बी. सायंस महाविद्यालयाजवळ) व्यवस्था करण्यात आली असून तेथे त्यांना पर्यावरण प्रेमी व नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात येईल. Maruti Chitampally त्याआधी सकाळी 8 ते 9 दरम्यान वनपरिक्षेत्र कार्यालयापासून पोस्ट ऑफिस चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी पुतळा मार्गे वनपरिक्षेत्र कार्यालयापर्यंत पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पदयात्रा काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वर्धा वनपरिक्षेत्र कार्यालयात अस्थी पूजन व शोकसभा घेण्यात येईल. यावेळी वृक्षारोपण करण्यात येईल.‌ चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पर्यावरण प्रेमी व वर्धेकर नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0