'या' आमदाराने आपल्या मुलीचे ऍडमिशन केले सरकारी शाळेत पण का?

29 Jun 2025 13:49:24
गडचिरोली,
MLA Sanjay Puram आजच्या काळात आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये शिकवण्यासाठी अनेक पालक मोठा खर्च करत आहेत. अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधीही याला अपवाद नाहीत. मात्र आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांनी याला अपवाद ठरवत एक समाजप्रेरक पाऊल उचललं आहे. त्यांनी आपल्या मुलीला खासगी नव्हे, तर गडचिरोली जिल्ह्यातील पुराडा गावात असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या सरकारी आश्रमशाळेत प्रवेश दिला आहे.
 
 

MLA Sanjay Puram 
संजय पुराम यांनी त्यांच्या कन्या समृद्धी हिला आठवी वर्गात याच आश्रमशाळेत दाखल करून, सरकारी शिक्षण व्यवस्थेवर असलेला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. विशेष म्हणजे, आमदार पुराम यांनी स्वतःही आश्रमशाळेतूनच शिक्षण घेतलं असून त्यांच्या मुलगा बिरसा पुराम यानेही पहिल्यापासून बारावीपर्यंतचे शिक्षण याच शाळेत पूर्ण केले आहे.या निर्णयामुळे केवळ शाळेचे नव्हे, तर संपूर्ण समाजाचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले आहे. पुराडा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कापसे यांनी सांगितले की, आमदारांची मुलगी शाळेत शिकत असल्यामुळे शाळेकडे आता अधिक लक्ष दिलं जाईल. शिक्षणाच्या गुणवत्तेसोबतच शाळेच्या गरजांनाही अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
 
 
आदिवासी MLA Sanjay Puram विकास प्रकल्प अधिकारी उमेश कासिद यांनीही या निर्णयाचं कौतुक करत, यामुळे सरकारी शाळांबाबत समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि इतर पालकांनाही प्रेरणा मिळेल, असं मत व्यक्त केलं.संजय पुराम यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेकजण सोशल मीडियावर त्यांचं अभिनंदन करत आहेत. आज जिथे केवळ इंग्रजी माध्यम, खासगी शाळा आणि आकर्षक फी स्ट्रक्चर यांनाच शिक्षणाचे निकष मानले जातात, तिथे एका लोकप्रतिनिधीने आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे की, दर्जेदार शिक्षण खासगी शाळांमध्येच मिळतं असं नाही.
जर अशा प्रकारे इतर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सामान्य पालकांनीही सरकारी शिक्षण संस्थांवर विश्वास ठेवला, तर त्या शाळांचं रूपच पालटू शकतं. आमदार संजय पुराम यांच्या या निर्णयामुळे सरकारी शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन नक्कीच सकारात्मक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0