राजस्थान,
Mahabharata and Mauryan culture राजस्थान राज्य प्राचीन इतिहासाचा मौल्यवान खजिना समजले जाते. त्याच राज्यातील नव्याने निर्माण झालेल्या डीग जिल्ह्यातील बहज गावात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) केलेल्या उत्खननात प्राचीन आणि विकसित संस्कृतीचे ठसे सापडले आहेत. हे अवशेष सुमारे ४५०० ईसापूर्व काळातील असल्याचा अंदाज आहे. या संस्कृतीचे संदर्भ महाभारत काळ व मौर्य साम्राज्याशी जोडले जात असून, या ऐतिहासिक शोधामुळे संपूर्ण परिसर चर्चेचा विषय ठरला आहे.
संस्कृतीचे महत्त्वपूर्ण अवशेष
डीग जिल्ह्यातील बहज हे गाव उत्तर प्रदेशातील मथुरापासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर, तर भरतपूरपासून ३७ किलोमीटरवर वसलेले आहे. याच भागात केलेल्या उत्खननात महाभारत काळातील मूर्ती, मौर्यकालीन स्थापत्यशैलीचे अवशेष, शुभ राजवंशाचे नाणी, ब्राह्मी लिपीत कोरलेले शिक्के, तसेच हाडांपासून तयार केलेली अवजारे सापडली आहेत.एएसआयच्या अहवालानुसार, येथे मातीच्या खांबांपासून तयार केलेल्या इमारती, थर असलेल्या भिंतींसाठी बनवलेले खंदक, भट्टी, शंखाच्या बांगड्या, अर्ध-मौल्यवान दगडांचे मणी आणि यज्ञकुंडांच्या अवशेषांसह लहान मातीची भांडीही मिळाली आहेत. या वस्तू प्राचीन जनपद संस्कृतीतील स्थापत्य आणि जीवनशैलीवर प्रकाश टाकतात.
प्राचीन नदी व सांगाड्याचा शोध
या उत्खननात सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे २३ मीटर खोलीवर सापडलेली नदी प्रणाली. तज्ञांचा अंदाज आहे की ही नदीच प्राचीन सरस्वती असू शकते. ही एक संभाव्य ऐतिहासिक जोड आहे, जी महाभारत काळातील संदर्भांशी जुळणारी आहे.उत्खननात एक सांगाडा देखील सापडला असून, त्याचे जैविक व वंशवृत्त तपासण्यासाठी तो इस्रायलला पाठवण्यात आला आहे. यावरून या परिसरातील मानव वंशवृत्त, आहार आणि जीवनशैलीबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
संरक्षित क्षेत्र म्हणून मान्यता?
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने संकलित केलेला सविस्तर अहवाल सांस्कृतिक मंत्रालयाला सादर केला असून, या भागाला लवकरच ‘राष्ट्रीय पुरातत्व संरक्षित क्षेत्र’ म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेचे ऐतिहासिक महत्त्व अधिक वाढणार आहे.या संपूर्ण उत्खनन मोहिमेमुळे राजस्थानातील डीग जिल्ह्याच्या बहज गावाने भारताच्या प्राचीन इतिहासात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. महाभारत आणि मौर्यकालीन काळाच्या सांस्कृतिक आठवणी जागृत करणारा हा शोध भविष्यात संशोधनासाठी आणि पर्यटनासाठी एक मोठे आकर्षण ठरू शकतो.