आ. राजेश बकाने यांनी घेतली ग्रामसेवक व तलाठ्यांची बैठक

29 Jun 2025 21:38:28
देवळी, 
Rajesh Bakane : देवळी व वर्धा तालुयातील ग्रामसेवक व तलाठ्यांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार २७ रोजी वर्धा येथील पंचायत समितीच्या सभागृहात आ. राजेश बकाने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आ. बकाने यांनी अधिकार्‍यांना अतिक्रमण पट्टे नियमबद्ध करण्याचे व आपत्ती व्यवस्थापनास सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
 
 
JK
 
यावेळी वर्धेचे तहसीलदार संदीप पुंडेकर, देवळीचे तहसीलदार समर्थ क्षीरसागर, अपर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर, गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे उपस्थित होते. आ. बकाने यांनी अतिक्रमण पट्टे हे नियमांच्या चौकटीत राहूनच दिले जावेत. कोणतीही बाब लपवून किंवा नियमबाह्य निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. गरजूंना न्याय मिळालाच पाहिजे, मात्र पारदर्शकतेतून. ग्रामसेवकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कोणत्याही पुरपरिस्थिती, नदी-नाल्यांतील पाणी वाढणे अशा परिस्थितीत तातडीने उपाययोजना होण्यासाठी आधीच नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
अतिक्रमणपट्ट्यांचे प्रस्ताव नियमांच्या चौकटीत तयार करून तहसील कार्यालयास सादर करावेत. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री पूर्वतयारीत ठेवावी. प्रत्येक तलाठी आणि ग्रामसेवकाने मुख्यालयात राहून जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार कार्य करावे. गावात पूरपरिस्थिती उद्भवू शकणार्‍या ठिकाणांची यादी तयार करून त्यावर आधारित आपत्ती आराखडा तयार करावा आदी सुचना आ. बकाने यांनी दिल्या.
 
 
बैठकीत गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे यांनीही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनात समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले. बैठकीला भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, माजी शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, नंदकिशोर झोटींग, गौरव गावंडे, महेश देवडे, दीपक तपासे, दिनेश सुरकार उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0