स्व. डॉ. रामदास आंबटकर यांना यवतमाळात श्रद्धांजली

03 Jun 2025 15:04:43
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Dr. Ramdas Ambatkar ‘मी जेव्हा यवतमाळात वैद्यकीय व्यवसाय सुरू करत होतो तेव्हा माझी रामदासजींची ओळख झाली. सुरुवातीच्या काळात त्यांचा प्रत्यक्ष सहवास घडला. ते करीत असलेले विद्यार्थी परिषदेचे काम, त्यानिमित्ताने सुरू असलेला संपर्क, संवाद, कामाची तळमळ तेव्हापासूनच जाणवत होती. पुढे त्यांचे कार्यक्षेत्र वाढले. विदर्भ प्रांत, महाराष्ट्र प्रदेश असे विस्तारले. त्यातूनही ते भेटीसाठी वेळ काढत. फेसबुकच्या माध्यमातूनही त्यांच्या विविध योजना, कार्यक्रम माहिती व्हायचे. माणसे जोडण्याचे व ते टिकवून ठेवण्याचे अद्भुत कौशल्य डॉ. रामदास आंबटकरांकडे होते, असे प्रतिपादन येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. अजित फडके यांनी येथे केले.


Dr. Ramdas Ambatkar
 
 
स्व. डॉ. रामदास आंबटकर यांच्या श्रद्धांजली सभेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. येथील आयुर्वेद महाविद्यालय सभागृहात रविवार, 1 जून रोजी संध्याकाळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र पदमावार यांच्या अध्यक्षतेत ही सभा घेण्यात आली. अभाविपचे यवतमाळात पूर्णवेळ कार्यकर्ते राहिलेले सुनील राजे, Dr. Ramdas Ambatkar पूर्व प्रांताध्यक्ष प्राचार्य रामदास पद्मावार, रामदासजींच्या अर्धांगिनी डॉ. गीता आंबटकर यावेळी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. रामदासजींच्या आवाजातील मुद्रित भजनाने प्रारंभ झालेल्या या सभेत पूर्व कार्यकर्त्या प्रा. डॉ. माणिक मेहरे यांनी ‘पूज्य मां की अर्चना का एक छोटा उपकरण हूं..’ हे वैयक्तिक गीत म्हटले.
डॉ. रामदास आंबटकर यांचे आयुर्वेद महाविद्यालयातील सहपाठी डॉ. रमेश व्यवहारे व त्यांना विद्यार्थी परिषदेच्या कामात आणणारे डॉ. सुधीर देशपांडे यांनी याप्रसंगी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. रामदासजी आम्हा सर्वांना घेऊन चालणारे होते. सामाजिक कामांच्या बाबतीत ते फार पुढे निघून गेले. Dr. Ramdas Ambatkar परंतु इतक्या लवकर आमच्यातूनच निघून जातील, असे वाटले नाही, असे ते म्हणाले. प्राचार्य रामदास पदमावार यांनी यावेळी विद्यार्थी परिषदेच्या कामात रामदासजींचे योगदान कसे होते, कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा कशी दिली, ‘ज्ञान चारित्र्य एकता’ ही त्रिसूत्री जगण्यास कसे शिकवले याचे सविस्तर विवेचन केले. सुनील राजे यांनी रामदासजींचे कार्यकर्त्यांशी वागणे किती जिव्हाळ्याचे होते, त्यांची तीच सलगी परमेश्वरासोबतही होती की काय असे वाटायचे याबाबतची उदाहरणे दिली.
सभेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र पदमावार यांनी रामदासजींनी संस्थेचा एक माजी विद्यार्थी म्हणून महाविद्यालयाच्या हितासाठी मंत्रालयापर्यंत बरीच मदत केली असे सांगितले. Dr. Ramdas Ambatkarश्रद्धांजली सभेचे संचालन विवेक कवठेकर यांनी केले. अभाविपचे आजी माजी कार्यकर्ते, आयुर्वेद महाविद्यालयातील डॉ. रामदास आंबटकरांचे वर्गमित्र, मित्रपरिवार, संघ व अन्य क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते. ‘वंदे मातरम’ व पुष्पार्चनाने सभेची सांगता झाली. व्यासपीठापुढे आर्णी येथील कलावंत पवन राठोड यांनी चितारलेली रामदासजींची पोर्ट्रेट रांगोळी लक्ष वेधून घेत होती.
Powered By Sangraha 9.0