विद्यापीठ आता नवीन कुलगुरूंच्या शोधात

- नियुक्तीसाठी राज्यपालांकडून समितीचे गठन

    दिनांक :03-Jun-2025
Total Views |
नागपूर, 
Vice Chancellor : गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुभाष चौधरी यांच्या निधनानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पूर्णवेळ कुलगुरूंशिवाय प्रभारी कुलगुरूंच्या भरवशावर काम करत आहे. सध्यस्थितीत गेल्या दोन महिन्यांपासून अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे या कुलगुरु पदाचा अतिरिक्त प्रभार सांभाळत आहेत. यापूर्वी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी हा अतिरिक्त पदभार सांभाळला होता.
 
 
 
rtmnu
 
 
 
मात्र, आता विद्यापीठाला लवकरच नवीन कुलगुरू मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. याकरिता राज्यपालांनी शुक्रवारी समिती गठित केली असून लवकरच विद्यापीठाकडून कुलगुरू निवड प्रक्रियेची जाहिरात देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. आणखी केव्हा पर्यंत विद्यापीठाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावर चालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे नियमात कुठलाही बदल केला नसून राज्यपालांकडून कुलगुरू निवड समिती गठित करण्यात आली आहे. निवड समितीची पहिली बैठक झाल्यानंतर कुलगुरू पदाच्या अर्ज प्रक्रियेबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर कुलगुरू निवड प्रक्रिया सुरु होणार आहे. आलेल्या अर्जांच्या छाननी झाल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. त्यापैकी योग्य अर्हताप्राप्त ५ उमेदवारांची निवड करून राज्यपालांकडे पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवण्यात येईल. राज्यपाल कार्यालयाद्वारे मुलाखती घेतल्यानंतर कुलगुरू पदावर नियुक्ती केली जाईल.