मुंबई,
Ghanashyam Darode ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे घनःश्याम दरोडे उर्फ ‘छोटा पुढारी’. या शोमधील त्याच्या हटके अंदाजामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे त्याला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली. शो संपल्यानंतर घनःश्यामने सोशल मीडियावर चांगलाच जम बसवला आहे. फोटो, स्टाईलिश व्हिडीओ, वैयक्तिक मतं अशा विविध माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहतो.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर घनःश्याम दरोडेच्या मृत्यूबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. काही पोस्ट्समध्ये त्याच्या निधनाची चुकीची माहिती शेअर केली जात असून यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ आणि चिंता पसरली आहे. यावर आता स्वतः घनःश्यामनेच मौन सोडत पोलिसांत धाव घेतली आहे.
घनःश्याम Ghanashyam Darode दरोडेने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासोबतच त्याने पोलिसांना थेट इशारा दिला आहे की, "जर १० दिवसांत ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाई झाली नाही, तर मी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेईन," असा इशारा त्याने दिल्याचे वृत्त समोर आले आहे.या प्रकरणामुळे सोशल मीडियावर आणि चाहत्यांच्या वर्तुळात खळबळ माजली आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी सोशल मीडिया यूजर्सकडूनही होत आहे. घनःश्याम दरोडेच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात असून, त्याला पाठिंबा दर्शवणाऱ्या पोस्ट्सही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत.