नवी दिल्ली
K-6 hypersonic missile भारत लवकरच आपल्या सर्वात आधुनिक आणि घातक क्षेपणास्त्रांपैकी एक असलेल्या K-6 हायपरसॉनिक इंटर-कॉन्टिनेंटल बॅलेस्टीक मिसाईल (ICBM) ची समुद्रात चाचणी घेणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यास भारताचा सामरिक बळ अधिकच वाढणार असून, चीन व पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे.
डीआरडीओची निर्मिती, जागतिक पातळीवर उंचावणार भारताची क्षमता
हैदराबादस्थित डीआरडीओच्या अॅडव्हान्स नेव्हल सिस्टीम्स लॅबोरेटरीने (ANSL) या क्षेपणास्त्राची निर्मिती केली असून, हे क्षेपणास्त्र आगामी S-5 श्रेणीतील न्यूक्लिअर सबमरीनमध्ये तैनात करण्याची योजना आहे. S-5 क्लासच्या पाणबुडीच्या तुलनेत सध्याची अरिहंत क्लासची पाणबुडी लहान आणि कमी क्षमतेची ठरणार आहे. K-6 क्षेपणास्त्राचा वेग 7.5 मॅक, म्हणजेच सुमारे 9,200 किलोमीटर प्रति तास आहे. तसेच याची मारक क्षमता 8,000 किलोमीटरपर्यंत असल्याने हे क्षेपणास्त्र थेट शत्रूच्या हृदयात घाव घालू शकते. इतक्या प्रचंड वेगामुळे कोणतीही एंटी मिसाईल डिफेन्स सिस्टिम याला अडवू शकणार नाही, हेच या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य मानले जात आहे.
MIRV तंत्रज्ञानाने सज्ज, एकच क्षेपणास्त्र अनेक लक्ष्यांवर हल्ला करणार!
K-6 मध्ये MIRV (Multiple Independently Targetable Reentry Vehicle) तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्रातून अनेक स्वतंत्र वॉरहेड्स वेगवेगळ्या टार्गेटवर अचूक मार करू शकतात. ही क्षमता भारताच्या रणनीतीला बहुआयामी रूप देणारी ठरणार आहे.हे क्षेपणास्त्र आण्विक व पारंपरिक दोन्ही प्रकारचे वॉरहेड्स कॅरी करण्यास सक्षम असून, विविध प्रकारच्या युद्धप्रसंगांसाठी ते वापरता येऊ शकते. सध्या भारताकडे असलेले K-4 (3,500 किमी रेंज) आणि K-5 (6,000 किमी रेंज) या सबमरीन-लाँच बॅलेस्टीक मिसाईल्सची ही पुढची पायरी मानली जाते.K-6 क्षेपणास्त्रामुळे भारताची न्यूक्लिअर ट्रायाड (Triad) आणखी बळकट होणार असून, थलसेना, वायुदल आणि नौदल या तिन्ही मार्गांनी आण्विक प्रत्युत्तर देण्याची भारताची क्षमता सिध्द होईल. जगातील मोजक्या देशांकडेच ही क्षमता आहे, आणि भारत त्यात सामील होणार आहे.