वेध
नितीन शिरसाट
Lonar Lake जागतिक दर्जाचे खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर वन्यजीव अभयारण्यामध्ये देशात दहाव्या आणि राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. लोणार अभयारण्य विदर्भ, मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य 365 हेक्टरमध्ये पसरलेले असून जिल्ह्यातील सर्वांत लहान अभयारण्य आहे. लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले जगातील एकमेव सरोवर आहे. वन व्यवस्थापन अभ्यास समितीने देशातील संरक्षित जंगलांचे व्यवस्थापन चार गटांमध्ये वर्गीकृत केले आहे. त्यात लोणार ‘उत्तम’ गटात आले आहे. या गटात 84 जंगलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोणतेही अभयारण्य वाईट गटात नाही, ही राज्याच्या वन पर्यटनाच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणावी लागेल. नुकत्याच झालेल्या एका अहवालात देशातील 438 राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांचे व्यवस्थापन तपासण्यात आले, ज्यामध्ये लोणार अभयारण्याचे दहावे स्थान निश्चित झाले. हे अभयारण्य लोणार सरोवराच्या परिसरात आहे आणि या सरोवराच्या जतन व संवर्धनासाठीच या परिसरास वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. भारतीय वन्यजीव संस्थान आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यंत्रणेने देशभरातील वन्यजीव अभयारण्याचा नुकताच आढावा घेतला. यामध्ये रामसर हा जागतिक कीर्तीचा दर्जा प्राप्त असलेल्या लोणार अभयारण्याचा देखील समावेश होता. देशभरातील 438 राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्याचे मूल्यमापन करण्यात आले. विविध जंगलांचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते. याचा अभ्यास गत पाच वर्षांमध्ये करण्यात आला. यामध्ये उत्तम स्थिती ही 84 ठिकाणी आढळून आली तर वाईटचा शेरा देखील 18 अभयारण्यांच्या वाट्याला आल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

लोणार हा पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी शासकीय पातळीवर आराखडा घोषित झाला आहे. जगभरातून पर्यटकांना बुलढाणा जिल्ह्यात खेचून आणण्याची क्षमता असलेल्या या लोणार सरोवर परिसरातील वनसंपदेच्या अनुषंगाने पर्यटन विस्ताराच्या सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. हे कधी होईल हा खरा प्रश्न मात्र सध्या अनुत्तरितच आहे. मात्र असे असले तरी देशभरातील अभयारण्य उत्तम व्यवस्थापनामध्ये लोणारचा दहावा क्रमांक लागणे ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे.
या सरोवराचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी 8 जून 2000 साली या परिसरास लोणार वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. परिसरात खूप प्राचीन अशी मंदिरेही आहेत. काही मंदिरे विवरातच आहेत. हेमाडपंथी स्थापत्यशैली असलेली ही मंदिरे आपल्याला आकर्षित करतात. अंडाकृती आकार असलेल्या या सरोवराची 60 हजार वर्षांपूर्वी निर्मिती झाली असावी असे तज्ज्ञ सांगतात. सरोवराचे पाणी खूप खारट असले तरी त्याच्या एका बाजूने एक सतत वाहणारा स्वच्छ असा गोड्या पाण्याचा झरा आहे. जवळपास 150 मीटर खोलीचे असे हे विवर आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.
यापूर्वी लोणार सरोवराच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी 370 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीमधून सरोवराचे जतन, संवर्धन, पर्यटन सुविधा वाढवणे आणि परिसरातील जैवविविधतेचे संरक्षण करणे अपेक्षित आहे. 15 कोटी रुपयांचा निधी सरोवराच्या संपादनासाठी मागण्यात आला होता. सरोवराच्या विकासासाठी 205 कोटी 12 लाखांचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. केंद्र व राज्य सरकारने लोणारला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची योजना आखली आहे. दरवर्षी पर्यटन महोत्सव आयोजित करण्याची सरकारची योजना आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल.Lonar Lake सरोवर परिसरातील प्रोसोपिस आणि आक्रमक तणांचे निर्मूलन, निसर्ग व्याख्या केंद्राचे उन्नतीकरण आणि पुनर्स्थापन, जुन्या न वापरण्यात येणाèया इमारतींचा सृजनशील पुनर्वापर, पर्यावरणपूरक संरचना आणि योग्य निसर्ग मार्गाची रचना, क्षेत्रीय योजनांची आखणी, वन्यजीव संपत्ती, पाण्याचे स्रोत आणि पर्यावरणीय अभ्यासास येथे वाव असल्याच्या सुधारणा सुचविण्यात आल्या. मानांकनामुळे निसर्गाचा चमत्कार वैज्ञानिकदृष्ट्या जागतिक दर्जाच्या या सरोवराचे जतन संवर्धन भविष्यातील संशोधकांना मोलाचा ठेवा राहणार आहे.
9881717828