अनिल कांबळे
नागपूर,
HSRP Number Plate : वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ३० जून मुदत दिली आहे. मात्र, केवळ २४ दिवसांत २४.५ लाख वाहनांना नवी नंबर प्लेट बसवणे नसल्याचे लक्षात येताच आता शहरात फिटमेंट सेंटरची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता शहरात विविध ठिकाणी वाहनांना नंबर प्लेट लावण्याची मुभा मिळणार आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाकडून १ जानेवारीपासून एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या प्रक्रिया आता पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होत आहे. मात्र, अजूनही वाहनधारकांचा एचएसआरपी नंबर प्लेटची ऑनलाईन नोंदणी करण्यावर नसल्याचे दिसत आहे. येत्या २४ दिवसांत जवळपास २४ लाख ५० हजार वाहनांची ऑनलाईन नोंदणी करणे बाकी आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्वच जुन्या वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवून घेणे परिवहन विभागाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक आता ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी आटापिटा करीत आहेत.
प्रादेशिक विभागाने आता तिसर्यांदा मुदत वाढ केली असून ३० जूनपर्यंत प्रत्येक वाहनधारकाने किमान ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शहरात नोंदणी असलेल्या २६ लाख ९३ हजार ३७५ जुन्या वाहनांपैकी केवळ १ लाख ९० हजारांवर वाहनांनीच नवीन नंबर प्लेट बदलविली आहे. हे प्रमाण केवळ २० टक्केच आहे. त्यामुळे येत्या २४ एवढ्या वाहनांची नोंदणी किंवा नवीन नंबर प्लेट बसविणे अशक्य आहे. ही बाब लक्षात घेता शहरात असलेल्या ९९ फिटमेंट केंद्रांच्या संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत फिटमेंट केंद्रांची संख्या वाढल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. फिटमेंट केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे वाहनधारकांना दोन ते तीन महिन्यांची वेटिंग देण्यात येत होती. आता सुटका मिळणार आहे.
दंड ठोठावल्यानंतर महिनाभराची मुदत
शहरात येत्या ३० जूनपर्यंत एचएसआरपीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यानंतर मात्र, वाहनधारकांना दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम भरल्यानंतर ती पावती केवळ एका महिन्यांची मुदतीसाठी राहणार आहे. महिनाभरात वाहनाधारकाला ऑनलाईन नोंदणी करुन एचएसआरपी प्लेट बंधनकारक आहे. अन्यथा पुढच्या महिन्यात पुन्हा दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.
शहरात सध्या एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी ९९ फिटमेंट सेंटर आहेत. वाहनांची संख्या बघता येत्या काही दिवसांत फिटमेंट सेंटरची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर नवी नंबर प्लेट लावून मिळेल. आलेल्या समस्यांवर समाधान काढण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- किरण बिडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)
अशी आहे आकडेवारी (५ जून)
एमएच ३१- शहर
एकूण नोंदणी - ९७४३४
एकूण अपॉईंटमेंट - ५९८४८
एकूण फिटमेंट - ४४५०४
एमएच ४९- पूर्व शहर
एकूण नोंदणी - ९२५१०
एकूण अपॉईंटमेंट -५१२५९
एकूण फिटमेंट - ३७५४४