नागपूर,
Nagpur News : दुचाकीने आलेल्या आरोपींनी 70 हजारांची रोख असलेली बॅग पळविली. ही खळबळजनक घटना धंतोली ठाण्यांतर्गत भरदुपारी घडली. मात्र, पोलिसांनी घटनेच्या 24 तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तुषार मेश्राम (20) रा. फुटाळा, समीर कावळे (22) रा. गोरेवाडा आणि अमन तोडसाम (24) रा. फुटाळा अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. लुटलेली रक्कम मैत्रिणीवर उधळली. मौजमस्ती, कपडे, दारू आणि मनसोक्त भोजन केले.
समीर हा मंडप डेकोरेशनचे काम करतो. अमन एका फार्मसीत हेल्पर म्हणून आहे तर समीर गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. कुंजीलालपेठ येथील रहिवासी फिर्यादी पवन नरांजे (38) हा एका कंपनीत काम करतो. कंपनीचे कर्मचारी ठिकठिकाणांहून गोळा केलेली रक्कम बँकेत जमा करतो तसेच फार्मसीतूनही गोळा करतो. ही माहिती अमनला होती. त्याने समीरला माहिती दिली. समीर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याने लूटपाट करण्याची योजना आखली. योजनेत तिघांनाही सहभागी करून घेतले. आधी काही दिवस रेकी केली. मार्गावर पाळत ठेवली. कोणत्या मार्गावर लूटपाट करणे सोयीचे होईल, याचाही अभ्यास केला.
घटनेच्या दिवशी म्हणजे 3 जून रोजी फिर्यादीने धंतोली परिसरातील एका फार्मसीमधून 70 हजारांची रोख रक्कम घेतली. बॅगमध्ये भरली आणि रक्कम बँकेत भरण्यासाठी तो दुचाकीने निघाला. दुपारी 12.45 ते दीड वाजताच्या सुमारास फिर्यादी अभ्यंकर मार्गाने जात असताना पाळतीवर असलेले आरोपी पाठलाग करीत त्याच्या मागेच होते. संधी मिळताच मागे बसलेल्या युवकाने पवनजवळची पिशवी हिसकली आणि पळाले. पवनने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत आरोपी पळून गेले. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी घटनेची गंभीर दखल घेतली. घटनास्थळाची पाहणी करून एक पथक तयार केले.
100 सीसीटीव्ही फुटेज तपासले
पथकाने जवळपास 100 सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपींची ओळख पटली आणि घटनेच्या 15 तासांत तुषारला पकडले. त्याने दिलेल्या माहितीवरून अमन आणि समीरही पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी तिघांनाही न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 8 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपासादरम्यान त्यांनी जवळपास 40 हजार रुपये खर्च केले. मैत्रीण, मौजमस्ती, दारू, मनसोक्त भोजन आणि कपडे घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून 30 हजार रुपये रोख, तीन मोबाईल, गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले. ही कारवाई पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे, सपोनि संकेत चौधरी, धनाजी मारकवाड, पोहवा सुभास वासाडे, अमोल लोनकर, मनोज सोनावने, माणिक दहिफळे, उत्तम सरकटे, भुनेश्वर मोहड यांनी केली.