बुलढाणा,
Pralhad Gaikwad सध्याची पिढी ही तंत्रज्ञान अवगत असलेली पिढी आहे. काळ सातत्याने बदलत आहे. बदलत्या काळाची पावले विद्यार्थ्यांना ओळखता आली पाहिजे. यश मिळवणे जेवढे कठीण असते. त्यापेक्षा मिळालेले यश हे पचवणे कठीण असते. मिळालेले यश टिकवणे देखील महत्त्वाचे असते. यशाचा आलेख उंचावणारा असला पाहिजे. परिस्थितीचे भान ठेवून विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करावे. ध्येय निश्चित करून त्याकडे मार्गक्रमण करता आले पाहिजे. गुणवत्ता आणि गुण याची सांगड जोपासणे म्हणजेच गुणवंत. असे प्रतिपादन भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांनी केले.
गर्दे वाचनालयाच्यावतीने इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना केले. दि.८ जुन गर्दे वाचनालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष विनायक वरणगांवकर हे होते. यावेळी व्यासपीठावर आशुतोष देशपांडे, शंकर सोळंके, वाचनालयाचे सचिव उदय देशपांडे ,डॉ. सुभाष जोशी ,आशुतोष वाईकर, संजय काळे,अॅड.अमोल बल्लाळ यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलतांना आशुतोष देशपांडे म्हणाले की सध्याचा काळ ए. आयने व्यापलेला आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर्सचे पॅकेज आता खाली येत आहे. लासरूम ते जॉब अशी असलेली संकल्पना भविष्यात लोप पावेल असे वाटते. स्पर्धेत टिकायचे असेल तर तुमच्याकडे आता विविध कौशल्य असली पाहिजे. कौशल्यावर आधारित असलेल्यांनाच भविष्यात जॉब मिळणार आहे. कौशल्य आणि ज्ञान याची सांगड ज्यांना घालता येईल त्यांच्या पुढेच आता व्यवसायाच्या संधी झपाट्याने बदलणार्या जगात उपलब्ध असणार आहे. असे मत आशुतोष देशपांडे यांनी व्यक्त केले. डॉ.सुभाष जोशी यांनी विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा संवाद शिक्षण घेताना कसा असतो. यावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की फक्त दहाव्या वर्गात अभ्यास कर नाही आता बाराव्या वर्गात कर आणि मग आता पुढे पदवीला पण कर .पालकांच्या अपेक्षा निश्चितच वाढत जातात. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे आवडते जे वाटते ते करा आणि त्यात निश्चितच यश मिळवण्यासाठी प्रयत्नंची पराकाष्टा करा. कोणाच्याही अपेक्षेचे बळी पडू नका. शेवटी सत्य हेच आहे की प्रयत्न आणि अभ्यास म्हणजेच यश. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक वरणगावकर यांनी गर्दे वाचनालयाच्यावतीने चालवण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी त्या त्या वयात कोणत्या गोष्टीचा त्याग करावा व त्यातून आपल्याला यश कसे मिळवू शकते हे आपल्या भाषणात सांगितले. शेवटी कोणत्याही क्षेत्रातील यशासाठी अभ्यास हा महत्त्वाचा आहे. आणि अभ्यास करूनच यश मिळू शकते असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कुलकर्णी यांनी केले. तर आभार प्रदर्शन अॅड.अमोल बल्लाळ यांनी केले .या कार्यक्रमासाठी बुलढाणा शहरातील विविध शाळांमधील इयत्ता दहावी व बारावीचे गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल नेमिनाथ सातपुते, श्रीकांत कुलकर्णी, सचिन बल्लाळ, कुंदना हिंगे, पालकर व राजगुरे यांनी पुढाकार घेतला होता.