हिंगणघाट,
Ganja Trafficking : गांजाची विक्रीकरिता वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने हॉटेल संस्कार जवळील मोठा मारोती मंदिर देवस्थानसमोर सापळा रचून अंकित वावरे (१९) रा. फुकटा आजनसरा ह. मु. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट आणि खेमेश भुते (२१) रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट या दोघांना अटक केली. ही कारवाई आज मंगळवार १ रोजी करण्यात आली.
पोलिस पथक गस्तीवर असताना गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी रिमडोह शिवारात जामकडून हिंगणघाटकडे येणार्या राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल संस्कार जवळील मोठा मारोती मंदिर देवस्थानासमोर सापळा रचला. त्यावेळी दुचाकीवर दोघेजण येताना दिसले. त्यांना थांबवून चौकशी केली असता अंकितच्या पाठीवर असलेल्या स्कूल बॅगमध्ये गांजा आढळून आला. गांजा मोमीनपुरा, नागपूर येथील फैजान नावाच्या इसमाकडून खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी २० हजार ७४० रुपये किमतीचा १.३७ किलो ग्रॅम गांजा, दुचाकी, दोन मोबाईल, असा १ लाख ५० हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांविरुद्ध हिंगणघाट पोलिसात गुन्हा नोंद केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल थूल, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, मनोज धात्रक, अरविंद येनूरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवी पुरोहित, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, विनोद कापसे, अभिषेक नाईक, अनिल साटोणे, अजित धांदरे, मंगेश धामंदे यांनी केली.