मुंबई,
Sanjay Shirsat and Shrikant Shinde उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला आयकर विभागाने मोठा झटका दिला आहे. शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली असून, खासदार श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संजय शिरसाट यांच्या उत्पन्नात झालेली अचानक वाढ आणि संपत्तीबाबत सादर करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटात खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील ‘व्हिट्स हॉटेल’ प्रकरणात शिरसाट यांच्यावर विरोधकांनी आरोप केले होते. या हॉटेलची खरेदी शिरसाट यांचा मुलगा करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. विरोधकांनी यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिरसाट यांचा मुलगा टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली होती. मात्र, या प्रकरणाची माहिती आयकर विभागाकडे पोहोचली आणि त्यांनी तपास सुरू करत नोटीस बजावली.
संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधत आपली बाजू स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “आयकर विभाग आणि अन्य शासकीय यंत्रणा आपलं काम करत असतात. त्यात काही चूक नाही. 2019 आणि 2024 मधील माझ्या मालमत्तेमध्ये झालेल्या वाढीबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. काही लोकांनी माझ्याविरोधात तक्रार केल्यानंतर विभागाने याची दखल घेतली. 9 जुलै रोजी उत्तर मागवण्यात आलं होतं, मात्र आम्ही वेळ मागितली आहे. आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही. आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार आहोत.”
शिरसाट यांनी स्पष्ट केलं की, “माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, आणि कुणी दबाव टाकण्याचा प्रयत्नही करत नाही. काही लोकांची पोटदुखी आहे, त्याला आम्ही समर्थपणे उत्तर देऊ. यंत्रणांवर आमचा कोणताही आक्षेप नाही. हे प्रकरण एवढं गंभीर नाही. आयकर विभागाला शंका असल्यास स्पष्टीकरण मागणं स्वाभाविक आहे. आम्ही 2024 च्या निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या शपथपत्रात सर्व माहिती दिली आहे.”श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले, “प्रत्येकाची छाननी होत असते. श्रीकांत शिंदे आणि मला नोटीस आली आहे. ही सामान्य प्रक्रिया आहे. कोणतीही नोटीस आली तर तिचं उत्तर देणं आवश्यक असतं. त्याचा राजकीय अर्थ काढण्याचं काही कारण नाही.”
या प्रकरणामुळे सत्ताधारी गटाच्या नेत्यांवर कारवाई होत असल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र, संजय शिरसाट यांनी आपली भूमिका ठामपणे मांडत, कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचं सांगितलं आहे. आयकर विभागाला आवश्यक असलेली सर्व माहिती दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिलं.