मुंबई :
Akshay Kumar बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अक्षय कुमार आता दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतही आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच प्रदर्शित झालेल्या 'कन्नप्पा' या तेलुगू पौराणिक चित्रपटात अक्षय कुमारने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे, ही भूमिका फक्त कॅमिओ असूनही ती चित्रपटाच्या कथानकात महत्त्वपूर्ण ठरते. मात्र या भूमिकेमुळे सध्या अक्षय कुमार चर्चेत नाही, तर एका वादग्रस्त व्हिडिओमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होतो आहे.
टेलीप्रॉम्प्टरमुळे खिलाडी कुमार अडचणीत
‘कन्नप्पा’ चित्रपटातील अक्षय कुमारचा एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये अक्षय कुमार भगवान शंकराच्या भूमिकेत संवाद बोलताना दिसतो. मात्र त्याच्या डोळ्यांच्या हालचालींवरून प्रेक्षकांच्या लक्षात आले की, तो संवाद म्हणताना टेलीप्रॉम्प्टरवर नजर ठेवून बोलत आहे. त्याच्या डोळ्याच्या बाहुलीमध्ये टेलीप्रॉम्प्टरची झलक स्पष्ट दिसत आहे, अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे.
यामुळे अनेकांनी अक्षयवर टीका करत त्याला 'टेलीप्रॉम्प्टर कुमार' असे म्हणत खिल्ली उडवली आहे. एका निराश चाहत्याने लिहिले, "असाच एखादा चित्रपट ४० दिवसांत पूर्ण होतो." तर दुसऱ्याने लिहिले, "एकेकाळी सर्वात मेहनती आणि समर्पित कलाकार असलेला अक्षय आता संवादसुद्धा लक्षात ठेवत नाही. सगळं टेलीप्रॉम्प्टरवरूनच वाचतो."२०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'कन्नप्पा' या भव्य पौराणिक चित्रपटाने सध्या तरी बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी केलेली नाही. भारतात चित्रपटाने अजूनही ५० कोटींचाही गल्ला पार केलेला नाही. यामुळे निर्माते चिंतेत आहेत.
स्टारकास्ट आणि कथानक
'कन्नप्पा' हा चित्रपट भगवान शंकराच्या भक्ताची कथा सांगतो. या चित्रपटात विष्णू मंचू मुख्य भूमिकेत असून तेच या चित्रपटाचे निर्मातेदेखील आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक मुकेश कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अक्षय कुमारसह प्रभास, मोहनलाल आणि काजल अग्रवाल यांच्यासारखी मोठी मंडळी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात.चित्रपट न्यूझीलंडमधील नयनरम्य लोकेशन्सवर चित्रित करण्यात आला आहे. अक्षय कुमारच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींना त्याचा लुक आणि उपस्थिती भावली, तर काहींना त्याचा संवादफेक आणि टेलीप्रॉम्प्टर वापर खटकला आहे.