भारत दूध उत्पादनात आघाडीवर

11 Jul 2025 13:24:19
Milk production भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जातो. दरवर्षी येथे कोट्यवधी टन दूधाचे उत्पादन होते. हे केवळ देशातील अंतर्गत गरजा पूर्ण करत नाही, तर लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचाही आधार ठरते. ग्रामीण अर्थव्यवस्थेची रीढ म्हणूनही हा क्षेत्र ओळखला जातो. देशाच्या विविध भागांतील दूध उत्पादनात फरक दिसून येतो. त्यात काही राज्यांचा वाटा विशेष आहे. भारतातील दूध उत्पादनाच्या बाबतीतील टॉप-५ राज्यांची माहिती खालीलप्रमाणे
 
 

उत्तर प्रदेश अव्वल स्थानी – महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर 
उत्तर प्रदेश – देशातील सर्वाधिक दूध उत्पादन उत्तर प्रदेशने १६.२१ टक्के दूध उत्पादनासह देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. येथील सुपीक जमीन, विस्तृत ग्रामीण लोकसंख्या आणि समृद्ध पशुधन परंपरा या घटकांमुळे राज्याला हे यश मिळाले आहे. पशु मेळावे, डेअरी प्रशिक्षण केंद्रे आणि विविध सरकारी योजनांमुळे दूध उत्पादनाला बळ मिळाले आहे.
राजस्थान – दुसऱ्या क्रमांकावर राजस्थानने १४.५१ टक्के उत्पादनासह दुसरा क्रमांक मिळवला आहे. राज्याची हवामानस्थिती कोरडी असूनही, दूध उत्पादनात राजस्थान आघाडीवर आहे. राठी आणि थारपारकर या स्थानिक जातींच्या गायी व म्हशी दूधासाठी प्रसिद्ध आहेत. ग्रामीण महिलांची सक्रिय भागीदारी आणि सहकारी संस्थांचे महत्त्वाचे योगदान यामुळे हा क्षेत्र आत्मनिर्भर बनले आहे.
मध्य प्रदेश – तिसऱ्या स्थानी मध्य प्रदेशचे राष्ट्रीय दूध उत्पादनात ८.९१ टक्के योगदान आहे. मुर्रा जातीच्या म्हशी व देसी गायीमुळे येथे उत्पादनाची गुणवत्ता चांगली राहते. डेअरी उद्योगाचा विस्तार झपाट्याने होत असून, अनेक युवकही या क्षेत्रात उतरले आहेत.
गुजरात – चौथा क्रमांक गुजरात ७.६५ टक्के दूध उत्पादनासह चौथ्या क्रमांकावर आहे. ‘अमूल’ या जगप्रसिद्ध ब्रँडचा उगम याच राज्यात झाला. दुग्ध सहकारी चळवळीत गुजरातचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे पशुपालनास प्रतिष्ठेचे व्यवसाय मानले जाते आणि शासनाने यासाठी अनेक प्रोत्साहन योजना राबवल्या आहेत.
महाराष्ट्र – पाचव्या स्थानावर महाराष्ट्राचे दूध उत्पादनातील योगदान ६.७१ टक्के आहे. विविध हवामान प्रकार असूनही राज्यात दूध उत्पादनात स्थिरता आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सहकारी डेअऱ्या कार्यरत आहेत. त्या शेतकऱ्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत पुरवतात. दुग्ध व्यवसायात महिलांचाही मोठा सहभाग दिसून येतो.
भारताचा हा एकत्रित प्रयत्न देशाला दूध उत्पादनाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर आघाडीवर ठेवतो. प्रत्येक राज्याची वैशिष्ट्ये आणि योगदान यामुळे ग्रामीण भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल बळकट होत आहे.
Powered By Sangraha 9.0