नवी दिल्ली,
Udaipur Files movie ban राजस्थानमधील कन्हैयालाल टेलर हत्याकांडावर आधारित ‘उदयपूर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. हा चित्रपट ११ जुलै रोजी म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. मात्र, प्रदर्शनाच्या केवळ एक दिवस आधीच गुरुवारी न्यायालयाने यावर बंदी घातली.
चित्रपटासाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) दिलेला प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसंदर्भात दाखल पुनर्विलोकन याचिकेवर केंद्र सरकार निर्णय घेईपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.‘उदयपूर फाइल्स’ हा चित्रपट २०२२ मध्ये घडलेल्या वास्तव घटनेवर आधारित आहे. २८ जून २०२२ रोजी राजस्थानच्या उदयपूर शहरात दोन इस्लामी कट्टरपंथ्यांनी कन्हैयालाल नावाच्या एका टेलरची त्याच्या दुकानात घुसून निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या चित्रपटात अभिनेता विजय राज यांनी कन्हैयालाल यांची भूमिका साकारली आहे. प्रीती आणि मुश्ताक खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन भारत एस. श्रीनेट आणि जयंत सिन्हा यांनी केले असून कथा अमित जानी, भरत सिंग आणि जयंत सिन्हा यांनी लिहिली आहे.चित्रपटाच्या घोषणेनंतरच काही संघटनांनी त्याला विरोध दर्शविला होता. जमात उलेमा-ए-हिंदचे मौलाना अर्शद मदनी यांनी या चित्रपटावर बंदीची मागणी केली होती. त्यानंतर काही मुस्लिम संघटनांनी एकत्र येत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परिणामी, उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या निर्णयापर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनावर थांबवणूक करण्याचे आदेश दिले आहेत.