वेध
रेवती जोशी-अंधारे
9850339240
changur baba दुबळ्यांच्या अहिंसेला कोणी विचारत नाही आणि सबळांच्या हिंसेवर कोणी जाबही विचारत नाहीत. एखाद्याला अनुल्लेखाने मारणे म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपले चांगले काम करीत, त्याच्यात बदल होण्याची वाट बघत राहायची. हा अतिचांगुलपणा म्हणजे सद्गुण विकृती! गेल्या आठवड्यात उत्तरप्रदेशातील बलरामपूरच्या धर्मांतराच्या घटनाक्रमाने हिंदूंची सद्गुण विकृती ढळढळीतपणे अधोरेखित केली आहे. छांगुर बाबा नावाच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. कांद्याच्या सालीप्रमाणे त्याच्या घाणेरड्या कारनाम्याचा पापुद्रा निघतोच आहे. दीडशे कोटींपेक्षा जास्त किमतीची संपत्ती, 40 पेक्षा जास्त बँक खात्यांमध्ये 106 कोटी रुपये, तयार कपड्यांचे अवाढव्य शोरूम अशी माया जमविणाऱ्या छांगुर बाबाचे हे कर्तृत्व आपल्या समाजासाठी, प्रशासन आणि पोलिसांच्या कर्तबगारीवर लागलेले प्रश्नचिन्ह आहे.
छांगुर म्हणजे ‘छ: अंगुलीवाला.’ ज्याच्या हाता किंवा पायाला सहा बोटं असतील त्याला युपी-बिहारमध्ये बोलीभाषेत ‘छांगुर’ असं म्हणतात. या शब्दावरून जात-धर्माचा संदर्भ लक्षात येत नाहीच. छांगुर बाबाचे खरे नाव जमालुद्दीन आहे. भिकारी ते बाबा असा जमालुद्दीनचा प्रवास गेल्या दहा वर्षांत धर्मांतरणाच्या लालबुंद निखाऱ्यांवर फुलत गेला. सायकलवर फिरून रंगबिरंगी मणी, विविध राशींचे दगड, जादुई परिणाम देणाऱ्या सटरफटर वस्तू विकणाऱ्या जमालुद्दीनचा खोटारडेपणा स्थानिकांच्या लक्षात आला. जमालुद्दीनने आपला गाशा गुंडाळला आणि मुंबईला पळाला. मुंबईत त्याला दुबईचे धागेदोरे गवसले. तिथल्या आकाने जमालुद्दीनला धर्मांतराचा कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्यासाठीचा फंडही! धर्मांतरणाच्या धुंदीत तारवटलेला जमाल ताठ मानेने आधी मुंबईत आणि मग बलरापूर जिल्ह्यातील रेहरा माफी या त्याच्या मूळ गावी पोहोचला.
त्याच्या फसवेगिरीच्या कौशल्याला आता एक दिशा मिळाली होती. हिंदूंसह इतर धर्मातील-समाजातील बायाबापड्यांना हेरायचं. त्यांच्या ‘दु:खाचे’ कारण अचूक ओळखून मदतीचा हात पुढे करायचा. गरजेप्रमाणे पैसा द्यायचा, इतरही मदत उत्साहाने करायची आणि आपला धर्मांतराचा हेतू साध्य करायचा, असं त्याचं काम जोमात सुरू झालं. कार्यविस्तारासाठी त्याला सहकाऱ्यांची गरज भासली. त्यानेच दुबईत वर्ष 2015 मध्ये धर्मांतरित केलेल्या नीतू आणि नवीन रोहरा या ब्रेनवॉश झालेल्या हिंदू-सिंधी जोडप्याने छांगुरचे दास्यत्व स्वीकारले. विशेष म्हणजे या जोडप्याचे सगळे कुटुंबच मुसलमान झाले.changur baba नीतू जी नसरीन झाली ती बाबाची मॅनेजर आणि नवीन बाबाचा ड्रायव्हर झाला. परिसरातील ‘दु:खी-कष्टी’ हिंदू पोरीबाळींना शोधण्याची जबाबदारी नवीनची झाली.
छांगुर बाबांच्या चमत्कारी आशीर्वादाची माहिती घरोघरी सांगायची. गरजेनुसार केलेल्या मदतीतून इस्लाम स्वीकारणे किती आवश्यक आहे आणि त्याला पर्याय कसा नाही? हे पटवून द्यायची जबाबदारी नीतूची! ग्रामीण महिला तिला मैत्रिणीसारखी समजून आपलं दु:ख सांगायच्या आणि ती त्यांना अलगद आपल्या जाळ्यात ओढायची. समाजातील जाती-व्यवस्थेचा लाभ छांगुरबाबाने बरोब्बर करून घेतला. कथित उच्चवर्णीय समाजातील मुलगी असेल तर 15 लाखांवर पैसे देण्याची तरतूद होती. प्रचलित जाती-व्यवस्थेप्रमाणे या दराची उतरंड होती.
जमाल आणि नसरीनच्या प्रयत्नांना अपेक्षित यश येऊ लागले. देशात ठिकठिकाणी जमिनी विकत घेणाऱ्यां जमालुद्दीनने उतरौलाच्या मधपूरमध्ये तब्बल 40 खोल्या, 15 पेक्षा जास्त मोठे हॉल असणारी कोठी बांधली. विदेशी ब्रीडचे कुत्रे, अस्सल अरबी घोडा, उंची परदेशी फर्निचर, महागडी झुंबरं इतकंच काय पण, दुबईचेच वॉशिंग पावडर वापरणाऱ्या जमालने शेकडो बायकामुलींचे धर्मांतर करविले.
जमाल आणि नीतू गेल्या तीन महिन्यांपासून लखनौच्या एका हॉटेलमध्ये पती-पत्नी म्हणून राहात होते. धर्मांतरणाचे प्रयोग या हॉटेलमधूनच सुरू होते. लखनौसारख्या राजधानीच्या शहरात त्यांचा भांडाफोड झाला आणि उत्तेजक औषधं, मालिशची तेलं, अमली पदार्थ, शिजर-ए-तय्यबासारखी इस्लामचा प्रचार करणारी पुस्तकं या मुद्देमालासह जमाल-नीतू जोडीला अटक झाल्यावर खुलासे झाले, होत आहेत. विशेष म्हणजे या सगळ्यात जमालला अति सहिष्णू आणि सद्गुण विकृतीची बाधा झालेल्या हिंदूंनीच मदत केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी जमालुद्दीनला ‘जल्लाद’ म्हणत, त्याच्यावर कारवाईची हमी दिली आहे. सुरुवात बुलडोझर कारवाईने झालीही पण, ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ असे तर होत नाहीये ना, हे समाजधुरिणांना बघायला हवे. शासन-प्रशासन आपलं काम चोख बजावेल, यात शंका नाही.changur baba पण, धर्मरक्षकांची परंपरा असणाऱ्यां आपली ही सद्गुण विकृती, आपल्या समाजाला अशीच पोखरत राहणार आहे का?