लॉर्ड्सवर इतिहास...केएल राहुलचे ऐतिहासिक शतक!

12 Jul 2025 19:00:53
लॉर्ड्स,
K.L. Rahul-Test Centuries : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी सध्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर रंगली आहे. या सामन्यात भारतीय सलामीवीर के.एल. राहुलने अफलातून शतक ठोकून केवळ संघालाच भक्कम सुरुवात मिळवून दिली नाही, तर लॉर्ड्सवर खास इतिहासही रचला. राहुल लॉर्ड्सवर दोन कसोटी शतके ठोकणारा पहिला आशियाई सलामीवीर ठरला आहे.
 

RAHUL 
 
 
 
दुसरे लॉर्ड्स शतक; कसोटीतील १०वे शतक
 
राहुलने १७७ चेंडूंमध्ये १० चौकारांसह १०० धावा करत इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. लॉर्ड्सवर त्याचे हे दुसरे कसोटी शतक ठरले आहे. याआधी त्याने २०२१ मध्ये १२९ धावांची खेळी याच मैदानावर साकारली होती. त्यामुळे लॉर्ड्सवर दोन कसोटी शतके करणारा तो केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. पहिला क्रमांक दिलीप वेंगसरकर यांचा असून त्यांनी येथे तीन शतके ठोकली होती.
 
यंदाच्या मालिकेतील दुसरे शतक
 
राहुल सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत उत्तम फॉर्ममध्ये आहे. याआधी लीड्समध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटीतही त्याने दुसऱ्या डावात २४७ चेंडूंमध्ये १३७ धावा करत शतक ठोकले होते. त्यामुळे ही त्याची मालिकेतील दुसरी शतकी खेळी ठरली.
 
ग्रॅमी स्मिथनंतरचा विक्रम
 
राहुलचे हे इंग्लंडमधील चौथे शतक आहे. २००० नंतर इंग्लंडमध्ये सलामीवीराकडून नोंदवलेले हे दुसरे सर्वाधिक शतक आहे. याआधी ग्रॅमी स्मिथने पाच शतके नोंदवली होती.
 
सामन्याचा आढावा
 
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून जो रूटच्या शतकाच्या जोरावर ३८७ धावा उभारण्यात आल्या. प्रत्युत्तरात, भारताने ५ गडी गमावून २५४ धावा केल्या असून के.एल. राहुल शतक पूर्ण करून लगेच शोएब बशीरच्या गोलंदाजीवर बाद झाला.
Powered By Sangraha 9.0